⁠
Inspirational

सुषमाच्या जिद्दीला सलाम!! एकाचवेळी चार पदांवर मारली बाजी; वाचा तिचा हा प्रवास..

Success Story सर्वसामान्यपणे संसारगाडा सांभाळत अभ्यास करणे, ही तारेवरची कसरत असते. पण वेळेचे व्यवस्थापन आणि घरच्यांचा खंबीर पाठिंबा असेल तर यश हे नक्कीच मिळते. दारिद्र्यात जीवन कुढत बसण्यापेक्षा आपल्यातील एकाने तरी शासकीय पदावर असावे, अशी सुषमा संतोष मंडले (Sushma Mandale) यांच्या पतीची मनोमन इच्छा होती. त्यांच्या या इच्छेला सुषमा यांनी आपले ध्येय बनविले. त्यासाठी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला.

आर्थिक परिस्थितीची जाणीव असलेल्या सुषमा यांनी अभ्यासाला प्राधान्य दिले. गाव, नातेवाईक, मोबाईल व समाजापासून दूर राहणे पसंत केले. घरची परिस्थिती बेताची असतानाही मिळेल ते वाचन साहित्य हातात घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. प्रचंड मेहनत व ध्यास घेऊन जिद्दीने अभ्यास करून सुषमा यांनी एकाच वेळी चार पदांना गवसणी घातली.त्यांना एकाच वेळी महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभाग, महाजनको, पुणे महानगरपालिका व महापारेषण येथे सहायक अभियंता राजपत्रित अधिकारी वर्ग दोन या पदावर बाजी मारली आहे.यातील जलसंपदा विभागास त्यांनी प्राधान्य दिले.

सुषमा या मूळच्या माण तालुक्यातील वरकुटे गावच्या रहिवाशी आहे. त्यांचा विवाह पोलिस दलातील संतोष मंडले यांच्याशी झाला. पती पोलिस दलात असल्याने सरकारी नोकरीचे महत्त्व जाणून होते. त्यामुळे त्यांनी सुषमा यांना अभ्यासासाठी बरीच मदत केली. तसेच सासरच्या मंडळींनी देखील घरातील सुनेला सून म्हणून नाही तर लेक, बहीण म्हणून प्रेरणा दिली. त्यामुळे, त्यांनी मुंबईत राहून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा जोरदार अभ्यास केला आणि हे घवघवीत यश मिळवले. सध्या त्या महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागातील सहायक अभियंता राजपत्रित अधिकारी पदी रूजू झाल्या आहेत.

घरातील सुनेला सून म्हणून नाही तर लेक, बहीण म्हणून घरच्यांनी प्रेरणा दिली. पती संतोष व दीर बंडोपंत यांनी जी उच्चपदाची स्वप्ने दाखवली, ती पूर्ण करण्यास यश आले. माझ्या यशात आई व कुटुंबीयांचा त्याग आहे. येणारा दिवाळी सण माझ्यासाठी आनंदाचा असेल.
सुषमा मंडले, वरकुटे

Related Articles

Back to top button