सध्याच्या घडीला महिलांचे विविध क्षेत्रातील अग्रेसर योगदान आणि काम हे अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. अशाच सुजाता सौनिक. आपल्या राज्यात प्रथमच सुजाता सौनिक यांच्या रूपाने महिला अधिकाऱ्यास मुख्य सचिवपदाची संधी मिळाली आहे. सुजाता सौनिक या निवृत्त आयएएस अधिकारी मनोज सौनिक यांच्या पत्नी आहेत. त्यातही सुजाता सौनिक या मुख्य सचिव झाल्याने पती आणि पत्नी मुख्य सचिव होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सुजाता सौनिक यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण चंदीगड मध्ये झाले आहे. त्यांनी पंजाब विद्यापीठामधून इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी घेतली. त्यानंतर, आपल्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. युपीएससी परीक्षेतून त्यांची आय.ए.एस पदी निवड झाली.
त्या १९८७ बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. तसेच वित्त, शिक्षण, आरोग्य सेवा, आपत्ती व्यवस्थापन आणि जिल्हा, राज्य आणि फेडरल स्तरावर शांतता राखणे आणि भारतीय प्रशासकीय सेवा, संयुक्त राष्ट्र यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सार्वजनिक धोरण आणि प्रशासनाचा अनुभव आहे. त्यांनी महाराष्ट्रात आर्थिक सुधारणा विभागाच्या प्रधान सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे.
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक यांनी ३० जून २०२४ रोजी पदभार स्वीकारला आहे. हा अभिमानास्पद प्रवास अनेकांसाठी दिशादर्शक आहे.