दोन आठवड्यापूर्वीच राज्यात नवीन सरकार अस्तित्वात आले आहे. शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून सरकार ऍक्शन मोडमध्ये आले आहे. दरम्यान,अशातच एका विद्यार्थ्याने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संपर्क करून तक्रार केली. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी तक्रारीची दखल घेतली आहे. पुण्यातील एका विद्यार्थ्याने मुख्यमंत्री शिंदे यांना मोबाईलवरून लोकसेवा आयोगाच्या अपुऱ्या जागांबद्दल कल्पना दिली आणि मुख्यमंत्र्यांना केलेल्या एका कॉलमुळे राज्यसेवेच्या ४०० जागांमध्ये वाढ झाली आहे.
राज्यसरकारच्या विविध विभागांनी मागणीपत्र दाखल न केल्यामुळे, राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेतील जागांची संख्या कमी होती. केवळ सहा विभागातील १६१ जागांचे परिपत्रक काढण्यात आले होते. उर्वरित विभागाचे मागणीपत्रच सामान्य प्रशासन विभाग अथवा एमपीएससी ला मिळाले नाही. (MPSC Latest Update) अपुऱ्या जागा आणि पुढील वर्षी बदललेल्या अभ्यासक्रमांमुळे अनेक विद्यार्थ्यांची संधी हुकणार आहे, अशी माहिती ललित पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांना फोन करून दिली. मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागणीची तातडीने दखल घेत, संबंधित विभागाला निर्देश दिले असून, सुमारे ४०० जागांमध्ये वाढ होणार असल्याचे कळविण्यात आले आहे, असे पाटील सांगतात.