चांगल्या पगाराची नोकरी सोडली; पण नेहाने मेहनतीने मिळवले IAS पद !
UPSC IAS Success Story : कोणतीही स्पर्धा परीक्षा म्हटलं की अनेक अडथळ्यांना सामना करत पुढे जावे लागते. दरवर्षी, अनेक उमेदवार अनेक अडथळे आणि आव्हानांना न जुमानता युपीएससी नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण होतात. नेहाने देखील अपयशाशी सामना करत आय.ए.एस पदापर्यंत मजली मारली आहे. नेहा भोसलेचा जन्म व जडणघडण मुंबईमध्ये झाली.
आधीपासूनच अभ्यासात हुशार असणारी नेहाने शालेय शिक्षणानंतर अकरावी आणि बारावी इयत्तेत विज्ञान शाखा निवडली. तसेच मुंबई विद्यापीठात अभियांत्रिकी पदवी परीक्षेचे शिक्षण घेतले. तिने अभियांत्रिकी पदवी पूर्ण केल्यानंतर, तिने CAT परीक्षेत ९९.३६ टक्के गुण मिळवले.एमबीए करण्यासाठी प्रतिष्ठित अशा आय.आय.एम लखनऊ येथे स्थान मिळवले.
नेहाने एमबीए केल्यानंतर भारतीय कॉर्पोरेशनमध्ये तीन वर्षे काम केले. या नोकरीच्या असतानाच नेहाला यूपीएससी सीएसई उत्तीर्ण होण्याची आवड निर्माण होऊ लागली. त्यानंतर ती यूपीएससी परीक्षेची तयारी करू लागली. एका कॉर्पोरेशनमध्ये पूर्णवेळ नोकरी करत असताना, तिने २०१७ मध्ये पहिल्यांदा युपीएससीची परीक्षा दिली. पहिल्याच प्रयत्नात ती ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकली नाही. ती या अपयशामुळे झाली नाही आणि तिने परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याचा निर्धार केला. २०१७ मध्ये पहिल्या प्रयत्नानंतर तिने तिच्या शिक्षणावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यासाठी तिच्या कामाचा राजीनामा देण्याचे निर्णय घेतला. या निर्णयामुळे तिने अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित केले. त्यामुळे, ती २०१९ मध्ये, तिसर्या प्रयत्नात १५व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली.