UPSC IAS Success Story : आयएएस अधिकारी आणि डॉक्टर हे भारतातील दोन लोकप्रिय क्षेत्र आहेत…पण अक्षिताने वैद्यकीय क्षेत्र सोडून शासकीय सेवेत येण्याचा ध्यास घेतला आणि ते स्वप्न पूर्ण झाले.डॉ. अक्षिता गुप्ता ही मूळची चंदिगडची असून तिचे वडील पवन गुप्ता हे पंचकुलातील वरिष्ठ माध्यमिक विद्यालयात प्राचार्य आहेत. तिची आई मीना गुप्ता या सरकारी वरिष्ठ माध्यमिक विद्यालयात गणिताच्या लेक्चरर आहेत.
अनेकवेळा मुलं जबाबदारीमुळे आपलं स्वप्न बाजूला ठेवून वेगळ्या क्षेत्रात काम करतात. असं असलं तरी कधीकाळी पाहिलेलं स्वप्न मन विसरू देत नाही. अशाच एका तरुणीनं आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलं आणि परिस्थितीवर मात करत तिचं स्वप्न पूर्ण करून दाखवलं. तिने वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यास पूर्ण करताना यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. यात वेळेचे व्यवस्थापन केले. तिने आपला सगळा फुरसतीचा वेळ यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी दिला. त्यानंतर, अक्षिताने परीक्षेची तयारी करत असताना रुग्णालयात डॉक्टर म्हणून देखील काम केले.
ती जवळपास १४-१५ तास हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायची. पुढे आपला १५ मिनिटांच्या ब्रेकमध्ये देखील युपीएससीचा परीक्षेचा अभ्यास करायची. कामाचे क्षेत्र, व्यवस्थापन आणि आवड या तिन्ही गोष्टी लक्षात घेऊन तिने नियोजन केले. तिने यूपीएससीच्या तयारीसाठी वेळापत्रक देखील बनवले होते. ते वाचून महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करत असे. मग ती हायलाइट केलेले मुद्दे पुन्हा पुन्हा वाचायची. अक्षिताने यूपीएससीच्या अभ्यासक्रमानुसार तिची सर्व वैद्यकीय पुस्तके तपासली आणि त्यातून आवश्यक विषय देखील निवडले.त्यामुळेच, तिने २०२० मध्ये पहिल्याच प्रयत्नात युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आणि ६९वी ऑल इंडिया रँक मिळवली.