घरची केवळ अर्धा एकर शेतजमीन, आई-वडील शेतकरी, तोकडी शेती आणि दूध व्यवसायावर कुटुंबाची गुजराण. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पुढचे शिक्षण घेणे अशक्य. त्यामुळे आठवीनंतर शाळा सोडली आणि सरळ हॉटेलमध्ये वेटरचे काम केले. पण आयुष्यात काही तरी करून दाखवायचे, ही जिद्द मनात बाळगून पुन्हा शाळेचा रस्ता धरला. कठोर परिश्रमाच्या जोरावर पाल (ता. भुदरगड) येथील संदीप नामदेव गुरव याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या पोलिस उपनिरीक्षपदाच्या परीक्षेत राज्यात सहावा, तर इतर मागासवर्ग प्रवर्गात पहिला क्रमांक पटकावला
आई-वडील शेतकरी आणि तेही अशिक्षित. घरात कोणत्याही प्रकारे शैक्षणिक पार्श्वभूमी नाही. घरची अवघी अर्धा एकर जमीन, दूध व्यवसायावर कुटुंबाची गुजराण मुलांना शिक्षण देण्यासाठी पालकांनी घेतलेले कष्ट वाखाणण्यासारखे आहे. संदीपचे आई, वडील आपल्या शेतीत कष्ट करून आणि म्हशी पाळून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. बऱ्याचदा जनावरांना चरण्यासाठी जंगलात नेण्याची जबाबदारी संदीप पार पाडत असे. मुलांच्या शिक्षणासाठी पडेल काम करून शक्य ते सहकार्य करण्याची त्यांची भूमिका आहे. मुलाने स्पर्धा परीक्षेत मिळविलेल्या यशामुळे आई-वडिलांचा आनंद द्विगुणित झाला आहे. संदीपचा लहान भाऊ सचिन महाविद्यालयीन शिक्षण घेत असून तोसुद्धा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत आहे.
संदीपचे प्राथमिक शिक्षण विद्यामंदिर पाल, माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल,पालमध्ये तर उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण गारगोटी येथील कर्मवीर हिरे कॉलेजमध्ये झाले. प्राथमिक शाळेतून बाहेर पडल्यावर न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आठवीत प्रवेश घेतल्यावर घरच्या परिस्थितीमुळे आणि शिक्षणाचे महत्त्व न समजल्यामुळे संदीपने शाळा सोडून सांगलीला जाऊन हॉटेलमध्ये वेटरचे काम केले. दोन वर्षे हॉटेलमध्ये काम केल्यानंतर आयुष्यात काही करायचे तर शिकावे लागेल हे समजल्यामुळे शाळा शिकण्याची इच्छा झाली आणि पुन्हा न्यू इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश घेतला आणि दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले.
पदवीनंतर स्पर्धा परीक्षा देऊन शासकीय अधिकारी व्हायचे हा निश्चय केला आणि अभ्यासाला सुरुवातही केली. पण मार्गदर्शनासाठी कोल्हापूर, पुण्यासारख्या शहरातील स्पर्धा परीक्षा केंद्रात जाणे परिस्थितीमुळे जाणे शक्य न झाल्याने घरीच राहून परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. गणित विषयासाठी गारगोटीतील यश क्लासेस येथे, तर इंग्रजीसाठी ध्येयसाधना क्लासेस येथे मार्गदर्शन घेतले. शारीरिक तंदुरुस्तीसाठी श्री शाहू प्रबोधिनी, कोनवडे (ता. भुदरगड) येथे मार्गदर्शन घेतले. फक्त अवघड विषयासाठी क्लासेसकडे धाव घेतली. अन्य विषयांची घरीच तयारी केली. अभ्यासासाठी भरपूर वेळ दिल्यानेच यश मिळणे शक्य झाले. २०१३ पासून राज्यसेवा परीक्षेची तयारी सुरू केली. सलग दोन प्रयत्नांत अपयश येऊनही जिद्दीने पुन्हा प्रयत्न सुरूच ठेवला आणि तिसऱ्या प्रयत्नात यशस्वी झाले. पुढे अभ्यास सुरूच ठेवणार असून, आयपीएस अधिकारी बनण्याची मनोदय संदीपने व्यक्त केला.
परिस्थितीशी झटत, झगडत ध्येय डोळ्यासमोर ठेवून जिद्दीने प्रयत्न केले. आई-वडिलांनी विश्वास टाकून प्रोत्साहन दिल्यामुळे मला यश गाठणे शक्य झाले. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कठोर परिश्रमाबरोबरच परीक्षेच्या दृष्टीने सराव केला. यानंतर माझे टार्गेट आयपीएस अधिकारी होण्याचे आहे.
– संदीप गुरव
सदर लेख हा दैनिक महाराष्ट्र टाईम मधील आहे