⁠  ⁠

‘एमपीएससी’ परीक्षांमध्ये समांतर आरक्षणाचा गोंधळ सुरूच

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

मुंबई : समांतर आरक्षणाचा लाभ मिळाल्यास आरक्षण राहावे म्हणून आणि आरक्षणाच्या तरतुदीमुळे निवड न झाल्यास आरक्षण रद्द व्हावे म्हणून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचा गोंधळ अद्याप सुरूच आहे. यापुढे आयोगाच्या सर्व परीक्षांचे निकाल जाहीर करताना समांतर आरक्षण लागू न करण्याचा निर्णय आयोगाने जाहीर केला आहे.

शासनाने यापूर्वी समांतर आरक्षण लागू केले होते. त्यानुसार खुल्या प्रवर्गातील महिला, खेळाडू यांसाठी राखीव असलेल्या पदांवर फक्त खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचीच निवड केली जात असे. या निर्णयाच्या विरोधात उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली होती. समांतर आरक्षणाबाबत शासनाने १९ डिसेंबर रोजी शुद्धिपत्रक जाहीर केले. त्यानुसार खुल्या प्रवर्गातील निवड ही गुणवत्तेनुसार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे गुणवत्तेनुसार सर्व प्रवर्गातील महिला किंवा खेळाडू उमेदवार पात्र ठरू शकतील. या निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या निकाल पद्धतीतही आयोगाने बदल केले आहेत. आयोगाच्या यापुढील सर्व परीक्षांसाठी समांतर आरक्षणाचे सुधारित निकष लागू करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे १९ डिसेंबरपूर्वी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे मात्र निकाल जाहीर झालेला नाही, अशा परीक्षांसाठीही समांतर आरक्षण लागू होणार आहे. १९ डिसेंबरच्या निर्णयापूर्वी परीक्षा झाल्या आहेत, मात्र निकाल जाहीर झालेले नाहीत, अशा पदांसाठीही समांतर आरक्षण लागू होणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. मात्र आयोगाच्या या परिपत्रकाने उमेदवारांमधील गोंधळ अधिकच वाढवला आहे. गेल्या महिन्यात राज्यसेवा, पोलीस उपनिरीक्षक या पदांचे निकाल जाहीर करण्यात आले. या परीक्षा १९ डिसेंबरपूर्वी झाल्या असल्यामुळे त्या निकालातही बदल होणार का, असा प्रश्न उमेदवारांकडून उपस्थित करण्यात आला आहे. त्याचवेळी समांतर आरक्षणाबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही आयोगाने याबाबत निर्णय जाहीर केल्याचा आक्षेपही उमेदवारांनी घेतला आहे.

आयोगाने न्यायालयाच्या निकालानुसार आणि शासन आदेशानुसार निर्णय घेतला आहे. राज्यसेवा परीक्षेत समांतर आरक्षणाचे नवे निकष लागू करण्यात आले होते. त्यामुळे या निकालामध्ये फरक पडणार नाही. सध्या जाहीर न झालेल्या निकालांबाबतच नवे निकष लागू होणार आहेत.

प्रदीप कुमार, सचिव , महाराष्ट्र लोकसेवा आयोग

Share This Article