⁠
Inspirational

शिपायाची मुलगी MPSC परीक्षा उत्तीर्ण ; पहिल्याच प्रयत्नात झाली न्यायाधीश..

MPSC Success Story : महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC मार्फत विविध पदांसाठी परीक्षा घेतली जाते. MPSC परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवार अहोरात्र मेहनत घेत असतात. यात प्रतिकूल परिस्थितीवर जिद्दीनं मात करणारे अनेक उमेदवार यशस्वी झाले आहेत. अशातच काही दिवसापूर्वी MPSC च्या न्यायालयाच्या अंतर्गत झालेल्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले. यात सोलापूर जिल्ह्यातल्या एका शिपायाच्या मुलीनं या परीक्षेत यश मिळवलं असून ती पहिल्याच प्रयत्नात न्यायाधीश झाली आहे.

स्नेहा पुळुजकर असं या मुलीचं नाव आहे. स्नेहाचे वडील गेल्या 22 वर्षांपासून जिल्हा मध्यवर्ती बँकेत शिपायची नोकरी करतात. तर आई जिल्हा क्षयरोग केंद्रात कक्षसेविका आहे. स्नेहा लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. तिचं पहिली ते दहावीपर्यंतचं शिक्षण सेवा शिक्षण सेवा सदन प्रशालेमध्ये झालं.

स्नेहानं त्यानंतर दयानंद कॉलेजमध्ये विज्ञान शाखेतून शिक्षण पूर्ण केलं.ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये तिला गोल्ड मेडलही मिळालं आहे. स्नेहा एवढ्यावरच थांबली नाही वकिलीचं शिक्षण घेतानाही तिनं सुवर्णपदक पटाकावलं. आता पहिल्याच प्रयत्नात ती न्यायाधीश झाली आहे.

दयानंद विधी महाविद्यालयात शिकत असतानाच स्नेहानं या परीक्षेची तयारी सुरू केली होती. अ‍ॅड. सत्यनारायण माने आणि अ‍ॅड गणेश पवार यांनी तिला मार्गदर्शन केले. त्याचबरोबर सुयश आणि सुजित या भावंडांनी तिची साथ कधीच सोडली नाही. स्नेहाला शांतपणे अभ्यास करता यावा, करिअरवर फोकस करता यावं म्हणून दिवस-रात्र झटणारे आई-वडिल हे तिच्या यशाचे खरे शिल्पकार आहेत.

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अत्यंत साधारण परिस्थितीमध्येही यश संपादन करता येते, हे या निमित्तानं मला सर्वांना सांगायचं आहे. आगामी काळात सर्वसामान्यांना न्याय मिळावा म्हणून मी प्रयत्न करणार आहे, अशी प्रतिक्रिया स्नेहानं या यशानंतर दिली आहे.

Related Articles

Back to top button