जीडीपीत मोठी घसरण, आर्थिक विकासाचा वेग ८.२ वरुन ७.१ टक्क्यांवर
- आर्थिक वर्ष २०१८-१९ च्या दुसऱ्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) अर्थव्यवस्थेच्या विकासाचा वेग घटून ७.१ टक्के झाला आहे. यापूर्वीच्या तिमाहीत हाच दर ८.२ टक्के इतका होता. दरम्यान, एकवर्षापूर्वी याच तिमाहीत हा आकडा ६.३ टक्के इतका होता.
- डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये झालेली घसरण आणि ग्रामीण भागातून कमी मागणी हे घसरणीचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते. आर्थिक वर्ष २०१८-१९ च्या दुसऱ्या तिमाहीतील थोड्याशा घसरणीनंतरही जीडीपीच्या वाढीचा दर मागील आर्थिक वर्षाच्या त्याच तिमाहीच्या तुलनेत अधिक आहे.
- सकल मूल्य वर्धन (जीव्हीए) पहिल्या तिमाहीत ८ टक्क्यांच्या तुलनेत ६.९ टक्के राहिला. जीव्हीए उत्पादक अर्थव्यवस्थेचे चित्र दाखवते. तर जीडीपी ग्राहकांची मागणी दाखवते.
- कच्चे तेल, नैसर्गिक वायू आणि उर्वरकांच्या उत्पादनात झालेल्या घटीमुळे ८ प्रमुख क्षेत्रातील उद्योगाच्या वृद्धीचा दर ऑक्टोबरमध्ये ४.८ टक्के राहिला. ८ प्रमुख क्षेत्रांमध्ये कोळसा, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादन, खते, लोखंड, सिमेंट आणि वीज क्षेत्राच्या वाढीचा दर एक वर्षापूर्वी ऑक्टोबरमध्ये ५ टक्के तर २०१८ सप्टेंबरमध्ये ४.३ टक्के होता.
२७२ उपग्रह संपूर्ण जगाला देणार ‘फ्री वायफाय’
- चीनची कंपनी लिंकश्योर नेटवर्क लवकरच संपूर्ण जगाला मोफत वायफाय सेवा देण्याची शक्यता आहे. कंपनीच्या मते, त्यांचे पहिले उपग्रह पुढीलवर्षी चीनमधील गासू प्रांतातील जिऊकुआं उपग्रह स्थानकावरुन ते लाँच केले जाईल आणि २०२० पर्यंत अंतराळात असे १० उपग्रह पाठवण्याचे नियोजन केले आहे. २०२६ पर्यंत अंतराळात लिंकश्योरचे असे २७२ उपग्रह कार्यरत राहतील. त्याच्या माध्यमातून संपूर्ण जगाला मोफत वायफाय नेटवर्क उपलब्ध होईल.
- एका अहवालानुसार, जगातील ३०० कोटीहून अधिक लोक अजूनही इंटरनेटच्या सेवेपासून दूर आहेत. याचवर्षी स्पेसएक्सला अंतराळात ७ हजार स्टारलिंक उपग्रह पाठवण्यास परवानगी मिळाली आहे. येणाऱ्या काळात स्पेसएक्स अंतराळातून पृथ्वीवर इंटरनेट सेवा पाठवणारे १६०० उपग्रह अंतराळात पाठवणार आहे. स्पेसएक्स शिवाय गुगल, वनवेब आणि टेलिसॅटसारख्या कंपन्याही अशाच पद्धतीची योजना अंमलात आणण्याच्या प्रयत्नात आहेत. या कंपन्यांचे उपग्रह आणि बलून्सही अंतराळातून संपूर्ण पृथ्वीवर हायस्पीड वायफाय सेवा उपलब्ध करण्याचे काम करतील.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन
- अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 94 वर्षांचे होते.
- जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांच्या निधनाने अमेरिकेने एक मोठा राजकीय नेता गमावला आहे. जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश हे अमेरिकेचे 41वे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांनी 1989 ते 1993 या काळात राष्ट्राध्यक्ष पदाची धुरा सांभाळली होती. राष्ट्राध्यक्ष होण्याआधी त्यांच्याकडे आठ वर्षे अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी होती. तसेच, शीतयुद्ध संपुष्टात आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती.
- याचबरोबर, अमेरिकेचे 43 वे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांचे जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश हे वडील होते.
अभिनव बिंद्राच्या शिरपेचात मानाचा तुरा,
ISSF कडून मानाचा ब्लू क्रॉस पुरस्कार
- भारताचा माजी नेमबाजपटू आणि बिजींग ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्राने देशाची मान आणखी एकदा उंचावली आहे. 36 वर्षीय अभिनवला ISSF (आंतरराष्ट्रीय नेमबाजी संघटना) कडून मानाचा Blue Cross पुरस्कार घोषित करण्यात आलेला आहे.
- नेमबाजी क्षेत्रात ब्लू क्रॉस हा सर्वोच्च पुरस्कार ओळखला जातो. हा पुरस्कार मिळवणारा अभिनव बिंद्रा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. नेमबाजी क्षेत्रात आतापर्यंत केलेल्या चांगल्या कामगिरीबद्दल अभिनवला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्काराबद्दल अभिनवनेही आतापर्यंत आपल्या प्रवासात साथ दिलेल्या सर्वांचे आभार मानले आहेत.
- बिजींग ऑलिम्पिकमध्ये मिळवलेल्या सुवर्णपदकासह, अभिनव बिंद्राने 2006 साली झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचं सुवर्णपदकही पटकावलं होतं. याव्यतिरीक्त 7 राष्ट्रकुल खेळांची पदकं आणि 3 आशियाई खेळांची पदकंही अभिनवच्या नावावर जमा आहेत. त्याच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल भारत सरकारने त्याचा खेलरत्न, अर्जुन पुरस्कार आणि पद्मभुषण या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मान केला आहे.
जी-२०: जपान, अमेरिका आणि भारत म्हणजे ‘जय’-
- ब्यूनर्स आयर्स येथे आयोजित जी-२० शिखर परिषदेत शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या त्रिपक्षीय बैठकीत सहभागी झाले. बैठकीत महत्वाचे जागतिक मुद्दे आणि आव्हानांवर चर्चा झाली. मोदी यांनी एकत्रित मूल्यांवर कार्यरत राहण्यावर जोर देत म्हटले की, ‘जेएआय’ची (जपान, अमेरिका, भारत) बैठक लोकशाहीच्या मूल्यांसाठी समर्पित आहे. ‘जेएआय’चा अर्थ ‘जय’ असा होतो.
- भारतात जय म्हणजे यश, विजय असा होतो. यातून एक चांगला संदेश जातो, असेही ते म्हणाले. अमेरिका आणि जपान हे आमचे भागीदार असून दोन्ही नेते माझे चांगले मित्र असल्याची पुस्तीही त्यांनी यावेळी जोडली.