⁠  ⁠

एकापाठोपाठ चार प्रशासकीय पदांवर बाजी; शेतकऱ्याच्या मुलाची यशाची कहाणी!

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

MPSC Success Story : घरी अठराविश्व दारिद्रय… संपूर्ण कुटुंब हे शेतीवर अवलंबून त्यात अल्पभूधारक शेतकरी. अशा वातावरणात जडणघडण झाली असली तरी आपल्या मुलाने उच्च शिक्षण घ्यावे व घराचे – गावाचे नाव कमवावे अशी हेमंतच्या वडिलांची इच्छा होती. आबासाहेब ढोकले यांचा मुलगा हेमंत ढोकले.

शिरूर तालुक्यातील करंदी येथील अगदी सामान्य शेतकरी कुटुंबातील हेमंत ढोकले यांचे शालेय शिक्षण हे त्यांच्या गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. तर माध्यमिक शिक्षणही गावातीलच विद्या विकास मंदिर शाळेत झाले. दोन्ही ठिकाणी त्यांची शैक्षणिक जडणघडण व्यवस्थित झाल्याने त्याचा अभ्यासाचा पाया पक्का झाला. त्यावेळी सर्व शिक्षकांनी ज्या पद्धतीने अध्यापन केले, ते आजही कामाला येत आहे.

त्याने पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढे त्यांनी पुणे येथे शिक्षण घेत स्पर्धा परीक्षेची तयारी सुरूच ठेवली. त्यांचा अभ्यासाचा पाया मजबूत झाला असल्याने पहिल्या प्रयत्नात २०११ मध्ये पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत यश मिळाले. २०१७ मध्ये सहायक पोलिस निरीक्षक आणि सन २०१८ मध्ये मुख्याधिकारी परीक्षेतही यश मिळवले.ऑक्टोबर २०१७ ते लोणंद नगरपालिकेच्या मुख्याधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी पुन्हा २०१९ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत एकापाठोपाठ चार महत्त्वाच्या पदे मिळविली आहेत.

यानंतर आता तहसीलदार पदाला गवसणी घातली आहे. अभ्यासातील सातत्य आणि स्वप्नांसाठी मेहनत हे त्यांच्या यशाचे खरे गमक आहे. पोलिस उपनिरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, नगर परिषद मुख्याधिकारी, अशा विविध पदांच्या चढत्या कमानीने यश मिळवित असलेल्या हेमंत आबासाहेब ढोकले यांची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी प्रवास आहे.

Share This Article