एकाच कुटुंबातील दोन्ही मुलींना सरकारी नोकरी मिळणं, हे त्या कुटुंबासाठी अभिमानास्पद बाब आहे. आंबेगाव तालुक्यातील जाधववाडी येथील हे शेतकरी कुटूंब.प्रांजल संतोष जाधव आणि काजल संतोष जाधव या दोन्ही सख्या बहिणीची प्रशासकीय सेवेत निवड झाली आहे.या दोघींचे प्राथमिक शिक्षण जाधववाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. तर पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण रांजणी येथील नरसिंह विद्यालयात पूर्ण झाले आहे.
पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोघींनी ठरवले की आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात करायची. प्रांजल हीची पोलीस कॉन्स्टेबलपदी निवड झाली आहे.यापरीक्षेत खुल्या गटातून १५० पैकी १२६ गुण मिळाले आहे. शेतकरी कुटुंबातील प्रांजल ही रांजणी येथील नरसिंह क्रीडा मंडळाची सदस्य असून अनेक वर्ष खो-खो खेळत आहे. तिने आतापर्यंत पाच राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा खेळून चार सुवर्ण पदके मिळवली आहेत. तसेच पुणे युनिव्हर्सिटी संघाकडून खेळतानाही तिने एक रौप्यपदक पटकावले आहे.
तर, तिची लहान बहीण काजलची देखील दोन महिन्यापूर्वी तलाठीपदी नियुक्ती झाली आहे.शेतकरी कुटुंबातील नुकतीच ठाणे शहर पोलिस कॉन्स्टेबलपदी मोठी पोलीस तर छोटी तलाठी दोघी सख्या बहिणी प्रशासकीय सेवेत गेल्याने सर्वस्तरातून कौतुक होत आहे.