सध्याच्या घडीला दिवसागणिक शैक्षणिकदृष्या व्यवस्थेत होणारा अप्रगत बदल, वाढते पानशेत पॅटन व झपाट्याने वाढत चालणारे खाजगीकरण बघता जिल्हा परिषद शाळा टिकून ठेवणे, ही शिक्षकांच्या पुढे मोठी कसरत आहे. तरीही खडू – फळा या व्यतिरिक्त गुणवत्तापूर्ण शिक्षण रूजवण्याचे काम रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील गजानन जाधव करत आहेत.
गजानन जाधव हे मूळचे मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील रोकडा सावरगाव येथील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले गुरूजी. वडील पोलीस खात्यात असल्याने तसे चांगले शैक्षणिक वातावरण होते. त्यांचा घरच्यांनी व हितचिंतकांनी ज्या स्थितीत डी.एडला प्रवेश घेतला त्याच्या धास्तीने अभ्यास करून २००६ साली ६९% सह परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यावेळी जवळपास १२ ते १५ हजार शिक्षकांची भरती निघाली होती. भरपूर पदांच्या भरतीमुळे लवकरच नोकरी हाताशी आली. आताच्या काळाचा विचार करता कित्येक जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक नाहीत. महाराष्ट्रात कित्येक शाळा ह्या एकशिक्षकी, व्दिशिक्षकी शाळा चालू असताना शिक्षकांवर या सगळ्या ओझांचा भार येत आहे.
याविषयी सांगताना गजानन जाधव सर म्हणतात की, “मुलं होती… तेव्हा शाळा नव्हती आता सुसज्ज शाळा आहे पण शिक्षक नाहीत.शाळेत पहिली ते सातवी वर्ग पटसंख्या ११३ आणि शिक्षक एकटाच…नवीन शिक्षक भरती नाही. यात शिक्षकांची कमतरता…हा खूप कठीण काळ आहे. मुलांना सांभाळावं की शिकवावं की शालेय कामकाज पहावं ह्यात गोंधळ उडाला आहे.दुर्गम भाग असल्याने उत्साहाने कोणी यायला तयार नाही.पट वाढला पण त्या मुलांना शिकवायला शिक्षक पर्याप्त नसल्याने त्या दुर्गम आदिवासी भागातील मुलांचा शिक्षणाचा प्रश्न अवघड झाला आहे”.
रायगड जिल्हात खूप मोठ्या प्रमाणात कातकरी – आदिवासी समुदाय आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या बहुतेक शाळा ह्या आदिवासी पाड्यात दिसून येतात. मूळ गावापासून बऱ्याच दूर अंतरावर पायी चालत शाळा गाठावी लागते. गजानन जाधव ज्या शाळेत काम करत आहे. ती देखील आदिवासी पाड्यातील एक शाळा.कातकरी बोलीभाषिक मुलं, संस्कृती व जीवनशैली…त्यांना यांचा सहवास जसं जसा लाभला तसे त्यांना तिथल्या समस्या लक्षात येऊ लागल्या. त्यांची भाषा मुलांना समजायची नाही आणि मुलांची भाषा पण त्यांना समजायची नाही. आसपासच्या भागात मोठ्याप्रमाणात वीटभट्टी उद्योग चालू असल्याने स्थलांतर मोठ्याप्रमाणात होत असे. मुलांना शाळा आणि शिक्षण समजून सांगणे ही मोठी कसरत होती. जी मुलं दररोज शाळेत मुलं यायची ती कातकरी बोलीभाषा बोलायचे.
त्यामुळे त्यांच्या कानावर आपुसकच कातकरी भाषेतील शब्द कानावर पडायचे. आपण जर त्यांचीच भाषा शिकलो तर ते आपल्याला लवकर स्वीकारतील. त्यामुळे शाळेची पटसंख्या पण वाढेल आणि मुलांसोबत संवाद देखील होईल, हे त्यांना लक्षात आले. त्यानंतर, त्यांनी जून २०१४ मध्ये व्दिभाषिक शब्दांचा संग्रह तयार केला. याचीच पुढे, ‘कातकरी बोलीभाषा’ मार्गदर्शिका तयार केली. आपली भाषा गुरुजी बोलतात यात मुलांना निराळा आनंद वाटतं होता. त्यामुळे मुलांशी भावनिक नाते निर्माण व्हायला सोपे गेले. वर्गात शिकवताना ते सहज विचारायचे, काल कोणी ‘साकु’ खाल्ला ?, आज कोणी नवीन कपडे ‘पोवले’ ? असे प्रश्न विचारू लागले की, मुलं हसायची व त्यांना आनंद वाटायचा त्यामुळं झालं असं की मुलांच्या मनात एक भावना झाली की गुरुजी आपले आहेत, आपली भाषा बोलतात. कधी कधी ते घरी जाऊन सांगायचे ‘गुरुजी आमनी भाषा बोलह’ (गुरुजी आपली भाषा बोलतात).
हीच भाषेची गंमत आहे. भाषा हे शिक्षणाचे केंद्रबिंदू बनून जातं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा व्दिभाषिक शब्दसंग्रह आणि उपक्रम…याविषयी आठवण सांगताना सर म्हणतात की, मी ‘पाऊस’ ही कविता कातकरी भाषेत शिकवतो. जसे की, ‘पाणी’ (कातकरी बोलीभाषेत) पाणी पडह सर सर सर,
घर मा चल र भर भर भर… पाणी वाजह धडाड धूम,
पळह पळह ठोकह धूम…
पळीन पळीन आणाव घर,
पड रह पाणी दिस भर..
पाणी पडह चिडून चिडून, आईसन्या उंगत बिसह दडून..
त्यांच्या सगळ्या उपक्रमास एवढा प्रतिसाद मिळाला की,
आदिवासीवाडीवर तयार झालेला उपक्रम ३६ जिल्ह्यातील जवळपास १५००० शिक्षकांपर्यंत पोहोचला.
याच उपक्रमांतर्गत त्यांनी बोलीभाषेतून गोष्टी, कविता, धडे असे एक ना अनेक साहित्याची निर्मिती केली.आदिवासी पाड्यातील मुलांसाठी नवं शैक्षणिक साहित्य उभं राहणं, ही महत्त्वाची बाब आहे. आदिवासी मुलांशी समरस होऊन जीवनकौशल्याबरोबर हे धडे देणं, ही शिक्षणाची खरी गरज आहे.
यात शासनाच्या भवताली काम करायचं म्हटलं तर शिक्षकांची बदली यातील एक भाग…ही नुसती कागदोपत्री बदली नसते तर यात भावनिक नातं तुटतं असतं.अशीच कोरोनाच्या काळात गजानन जाधव सरांची बदली अत्यंत दुर्गम भागात झाली. ज्यावेळी आसपास ऑनलाईन झूम व यासारखी अनेक डिजीटल शिक्षण पध्दती उद्यास येत होती… तेव्हा येथील मुलांना हक्काची शाळा नव्हती. डोंगर माथ्याच्या कुशीत, दाटीवाटीने जंगल असणाऱ्या चिंचवली गावातील ही शाळा. त्यात कोरोनाचे संकट…ना इकडे इंटरनेट, ना सोयीसुविधा यातही शासनाची बंधने, शाळा पुर्णपणे बंद… मुलांना कसं शिकवायचे? शिक्षणात बऱ्याच वर्षांचा खंड पडला तर मुलं प्रवाहाच्या बाहेर जाऊ शकतात ही अधिकची चिंता… त्यामुळे त्यांनी शिक्षणापासून मुले दूर जाऊ नये म्हणून कोणाच्या घराच्या वसरीवर, कोणाच्या ओटीवर, अंगणात, मंदिरात, तर कधी जुन्या शाळेच्या वास्तूत शाळा भरवायला सुरुवात केली. त्यात २०२० साली निसर्ग वादळाने धुमाकूळ घातला. जे काही छोटीशी शाळा होती, ती या वादळाने उध्वस्त करून टाकली. कोरोनाचा भयावह काळ, त्यात शाळा नाही ही चिंतेची बाब होती. सरांनी, माळावर झाडाखाली निसर्गशाळा सुरू केली. माळावर शाळा भरू लागल्यामुळे एक तर .. कोरोनाच्या संसर्गापासून बचाव होणार होता व अंतरा-अंतरावर मुलांना बसायला मिळाल्यामुळे नियम पण पाळले जाणार होते.
मुलांना पण बिंधास्तपणे आनंदाने बागडत शिकायला मिळायचे. कोणी झाडावर चढायचे तर कोणी पोहायला जायचे…तर कोणी निसर्गाच्या सानिध्यात राहून अभ्यासात रमायचे. दररोज माळावरच्या शाळेत मुले आवडीने येऊ लागली… कधी फळ्यावर आवडीने शिकू लागले तर कधी गोल रिंगण करून अनौपचारिक गप्पातून ज्ञानार्जन करू लागले. त्यांचा एकच प्रयत्न होता की मुलांना जीवन शिक्षण, मूल्य शिक्षण, निसर्ग शिक्षण देऊन त्यांच्यात शाळेची आवड निर्माण करायची व वीटभट्टीवर, कोळसा भट्टीवर होणारे स्थलांतर रोखायचे. रायगड जिल्ह्यातील आदिवासी पाड्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतर होतं असते...ते रोखण्यासाठी सरांनी गेल्या १७ वर्षांत मोलाची कामगिरी केली. त्याप्रमाणे मुलांच्या आवडीप्रमाणे शिक्षण द्यायला सुरू केले, कधी कागदकाम, कधी मातीचे भांडी बनवणे, कधी रिकाम्या पाण्याच्या बॉटल पासून आकाश कंदील बनवणे तर कधी गलोल बनवणे असे वेगवेगळे उपक्रम माळावरच्या शाळेत राबिवले. पण हे किती दिवस चालणार? पावसापाण्यात काय होणार? मुलांना हक्काचे छत कधी मिळणार? त्यांना असे एक ना अनेक प्रश्न भेडसावू लागले. वेळोवेळी समाज माध्यमांवर याविषयी लेखन करू लागले.
शाळा शासकीय असली तरी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा हा लढा होता. शासन त्वरित मदतीला धावून येत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी वरिष्ठांना, कंपनीला मागणी पत्रे देणे, शाळेचा प्रश्न मांडायला सुरुवात केली. या सगळ्या प्रयत्नांना यश आले. डीआरटी अँधिया कंपनीने मुलांच्या स्वप्नातील शाळा बांधून देली. सध्या शाळेत सोयीसुविधा, बैठक व्यवस्था, सुसज्ज खोल्या व हसतं वातावरण आहे. हा कायापालट विद्यार्थ्यांच्या जगण्याचा भाग आहे. भविष्याच्या नवं क्षितिजांना गवसणी घालण्याची साद आहे. जिल्हा परिषद शाळेतला शिक्षक इतक्या जीवाभावाचे जीवन जगतो ही आनंददायी बाब आहे. इतकेच नाही तर, त्यांनी त्यांच्या मुलाला देखील जिल्हा परिषद शाळेत टाकले आहे. शाळा टिकून ठेवणं, मूल्ये रूजवणं हे कृतीयुक्त काम इकडे घडून येताना दिसून येते.