⁠  ⁠

चालू घडामोडी : ३० एप्रिल २०२०

Rajat Bhole
By Rajat Bhole 3 Min Read
3 Min Read

देशातील महाविद्यायांबाबत युजीसीने जाहीर केलं वेळापत्रक

देशातील महाविद्यालयं उघडण्यासाठी ऑगस्ट महिना उजाडणार असल्याची माहिती विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात UGC ने दिली आहे. सध्या महाविद्यलयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयं ऑगस्टमध्ये सुरु होणार तर नव्या विद्यार्थ्यांसाठी ही महाविद्यालयं १ सप्टेंबरपासून सुरु होणार असं विद्यापीठ अनुदान आयोगाने स्पष्ट केलं आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यात शाळा आणि महाविद्यालयं बंद करण्यात आली होती. महाविद्यालयीन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्याची तारीखही जाहीर करण्यात आलेली नाही. अशात आता विद्यापीठ अनुदान आयोगाने महाविद्यालयं सुरु व्हायला ऑगस्ट महिना उजाडेल अशी माहिती दिली आहे. २०२०-२१ हे शैक्षणिक वर्ष सुरु होण्यासाठी १ ऑगस्ट ही तारीख देण्यात आली आहे.

UGC अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाने दोन वेळापत्रकं दिली आहेत. एक २०१९-२० या वर्षासाठी आहे. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाविद्यालयं बंद करण्यात आली. त्यामुळे या वर्षातला जो पाठ्यक्रम अपूर्ण राहिला आहे. त्यासाठी एक वेळापत्रक आणि नव्या शैक्षणिक वर्षासाठी एक वेळापत्रक देण्यात आलं आहे.

अभिनेता इरफान खानचं मुंबईत निधन

irfan khan
इरफान खान

आपल्या दमदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारा अभिनेता इरफान खानचे निधन झाले. Colon infection मुळे त्याला मंगळवारी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र बुधवारी सकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला. ५४ व्या वर्षी इरफानने जगाचा निरोप घेतला. जबर इच्छाशक्तीच्या जोरावर कॅन्सरवर मात केल्यानंतर तो भारतात परतला होता. लंडनमधील रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. सप्टेंबर २०१९ मध्ये इरफान खान उपचारानंतर पुन्हा भारतात परतला होता.

‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘पानसिंग तोमर’, ‘द लंचबॉक्स’, ‘हैदर’, ‘गुंडे’, ‘पिकू’, ‘तलवार’, ‘हिंदी मीडियम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या होत्या.

जवळपास ३० वर्षांच्या करिअरमध्ये इरफानने ५० हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं. बॉलिवूडसोबतच त्याने हॉलिवूडमध्येही छाप सोडली. कलाक्षेत्रातील अभूतपूर्व कामगिरीसाठी २०११ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात आला होता.

नविद अंतुले यांचे निधन

माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे पुत्र नविद अंतुले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. सैफी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर मुंबईतच अंत्यसंस्कार करण्यात आले. राजकारणापासून अलिप्त असलेल्या नविद यांनी बॅरिस्टर अंतुले यांच्या निधनानंतर सक्रिय राजकारणात प्रवेश केला होता. मात्र राजकीय वाटचालीसाठी त्यांनी काँग्रेसऐवजी शिवसेनेची निवड केली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

Share This Article