जर तुम्ही परिश्रमपूर्वक आणि संपूर्ण जोमाने तयारी केली असेल तर परीक्षा कितीही अवघड असो, तुम्हाला नक्कीच यश मिळते. अशीच एक प्रेरणादायक कहाणी बिहारमध्ये राहणाऱ्या अर्चनाची आहे. अर्चनाचे वडिल गौरीनंदन कोर्टात शिपाई होते. आता अर्चना कोर्टात जज बनली आहे. शालेय शिक्षणादरम्यान तिने वडिलांना न्यायाधीश होण्याचे वचन दिले होते. मात्र स्वप्न पूर्ण झाल्यानंतर या प्रसंगी तिचे वडील हयात नाहीत याचे तिला दुःख वाटत आहे.
पटना येथील कणकरबाग येथे राहणारी अर्चनाची बिहार न्यायिक सेवा स्पर्धा परीक्षेमध्ये निवड झाली आहे. दुसर्याच प्रयत्नात अर्चनाने बिहार न्यायालयीन सेवेत यश संपादन केले आहे. साध्या कुटुंबात जन्मलेल्या अर्चनाचे वडील गौरीनंदन हे सारण जिल्ह्यातील सोनेपूर व्यवहार न्यायालयात शिपाई होते. अर्चना हिने शास्त्रीनगर शासकीय हायस्कूलमधून 12 वी व पाटणा विद्यापीठातून पुढील शिक्षण घेतले. यानंतर तिने शास्त्री नगर शासकीय हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना संगणक शिकवणे सुरू केले. याच दरम्यान अर्चनाचे लग्न झाले. अर्चनाला लग्नानंतर वाटले होते की आता तिचे स्वप्न पूर्ण होणार नाही. मात्र तिच्या पतीने तिला प्रोत्साहन दिले. 2014 मध्ये त्यांनी बीएमटी लॉ कॉलेज पूर्णिया येथून एलएलएम केले.