MPSC Success Story मित्रहो, असे म्हणतात की चांगली संगत असेल तर चांगले यश मिळते, हेच या पाच मित्रांनी करून दाखविले आहे. हे पाचही जण २०१८ पासून अभ्यास करत होते. मध्यंतरी कोरोनामुळे अभ्यासात खंड आला पण जोमाने अभ्यास करण्यासाठी पुन्हा नाशिक गाठले. गंगापूर रोडवर अभ्यासिकेत अभ्यासाला सुरुवात केली. एकमेकांच्या अभ्यासातील अडीअडचणी शंका सर्वजण सोबत बसून सोडवत होतो. त्याचाच फायदा त्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत झाला. आता वाचूया यांच्या यशाची कहाणी…
आकाश दिपक बोढारे, अनिल भिमराव बत्तीशे, राहुल नानासाहेब पवार, राकेश कैलास निकम आणि शुभम नंदकुमार निकम या पाचही मित्रांनी नाशिकमधील एका अभ्यासिकेत दिवस रात्र एक करून, एकमेकांना मार्गदर्शन करून आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून यश संपादन केले आहे.
आकाश दिपक बोढारे हा चांदवड तालुक्यातील शिंदे भयाळे येथील रहिवासी आहे. त्याची राज्यकर निरीक्षक आणि मंत्रालय क्लर्क अशा दोन जागांवर त्याची निवड झाल्याने सर्वच स्तरावर त्याचे कौतुक होत आहे. त्याचे माध्यमिक शिक्षण शिंदे येथीलच जनता विद्यालयात झाले आहे. तर महाविद्यालयीन शिक्षण हे नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयातून झाले आहे. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाच्या काळात दरम्यान त्याने अनेक परीक्षा दिल्या, ज्यात तो पूर्व परीक्षा तर कधी मेन्स उत्तीर्ण होत असे, परंतु काही ना काही कारणास्तव यश पदरात पडत नसायचे. मात्र यंदा दोन पदे मिळवली.
अनिल भिमराव बत्तीशे हा देखील चांदवडचा असून त्याने देखील तमाध्यमिक शिक्षण शिंदे येथीलच जनता विद्यालयात पूर्ण केले आहे. पदवीचे शिक्षण हे नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयातून झाले आहे. विशेष म्हणजे अनिलने देखील दोन परीक्षा उत्तीर्ण केल्या असून आता तो पोलीस उपनिरीक्षक किंवा मंत्रालय क्लर्क या दोन पोस्टपैकी एकाची निवड करणार आहे.
राहुल नानासाहेब पवार हा नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील करंजगाव येथील आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा करंजगाव येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण जनता विद्यालय करंजगाव येथून पूर्ण केले आहे. तो दोन वर्षे सतत स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता आता त्याची मंत्रालय मुंबई येथे निवड झाली आहे.
तसेच राकेश कैलास निकम आणि शुभम नंदकुमार निकम हे दोन मित्र दिंडोरी तालुक्यातील मोहाडी गावातील रहिवासी आहे. या दोघांचे शिक्षण के.आर.टी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज मोहाडी येथे झाले असून ओझर येथील मराठा विद्या प्रसारक समाज कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.
राकेशने देखील दोन पदांची परीक्षा उत्तीर्ण झाला असून मुंबई मंत्रालयात क्लर्क आणि कर सहाय्यक पदासाठी त्याची निवड झाली आहे. तर शुभम नंदकुमार निकम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मंत्रालय क्लर्क म्हणून निवड झाली आहे. पाच मित्रांची ही गोष्टच न्यारी आहे. त्यातून मैत्रीची ताकद आणि अभ्यासासाठी असणारी मेहनत दिसून येते.