Success Story उस्मानाबाद जिल्हातील खानापूर गावातील ह्या हिरकणी….लहानपणापासून गावाची जीवन रहाणी, घरात शिक्षणाचा कसलाही गंध नाही, परिस्थिती अत्यंत गरिबीची आणि अडचणींचा न संपणारा पाढा…असे असून देखील परिस्थितीला जिद्द बनवत एकाच कुटुंबातील पाच बहिणी महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाल्या आहेत. यातील एक पोलीस उपनिरीक्षक तर चार पोलीस अंमलदार म्हणून कार्यरत आहेत. वाचा या मुलींची ही प्रेरणादायी यशोगाथा….
आपल्याकडे अजूनही वंशाला दिवा पाहिजे म्हणून मुलाच्या जन्मासाठी अट्टाहास धरला जातो. पण मुली देखील कुठे कमी नाहीत, हे या पाच जणींनी दाखवून दिले आहे.गटकूळ या एकाच कुटुंबातील पाच बहिणी महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाल्या. एवढ्यावरच न थांबता सारिका यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला. दोन अपयशानंतर त्याची राज्यसेवेतून पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली. सध्या त्या बार्शी येथे निर्भया पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. तर त्यांच्या सख्या बहिणी लतिका व विद्या उस्मानाबाद पोलीस दलात तुळजापूर पोलीस दलात कार्यरत आहेत. तर चुलत बहिण असलेल्या नम्रता या सोलापूर ग्रामीण पोलीस दलात पंढरपूर येथे तर सोनाली या सोलापूर येथे निर्भया पथकात कार्यरत आहेत.
त्यांचा गावात एक वाडा व थोडीफार शेती आहे . आधीपासूनच एकत्रित कुटुंब असल्याने, या शेतीवरच संपूर्ण कुटुंबीयांची उपजीविका चालते. दुष्काळी परिस्थितीमुळे शेती ही पूर्णपणे बेभरवशाची असायची. घरात सर्वजण अशिक्षितच असल्याने, घरात कसलाही शिक्षणाचा संबंध नाही. ती देखील त्यांच्या वडिलांनी त्यांना उच्च शिक्षित केले. आधीपासूनच गटकुळ कुटुंबातील बजरंग गटकुळ यांच्या तीन मुलींची व विक्रम गटकूळ यांच्या दोन मुलीची परिस्थितीवर मात करत वेगळे काहीतरी करून दाखवण्याची जिद्द होती. सगळ्या मुली लहानपणापासून अत्यंत हुशार असल्याने कुटूंबांनी देखील त्यांना पदोपदी पाठिंबा दिला. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने सारिका, लतिका मुलींच्या शिक्षणांचा संपूर्ण भार मावशी व मामांने उचलला. तर विद्याचे शिक्षण आईने काबाडकष्ट करून शिकवले. तर विक्रम यांनी नम्रता व सोनाली यांना कुटुंबाचा गाडा हाकत त्यातून बचत करत मुलींना शिक्षण दिले.
एकमेकांना आधार आणि प्रेरणा देत, संपूर्ण घरच्या परिस्थितीचे भान ठेवून मुलीही जिद्दीने शिकल्या, मैदानात देखील मजल मारली आणि खाकी वर्दीचे स्वप्न पूर्ण केले. हा महाराष्ट्रासाठी नवा आदर्श आहे, असे म्हणायला हरकत नाही.