⁠
Inspirational

मेहनतीच्या जोरावर लकीचे IPS अधिकारी होण्याचे स्वप्न झाले साकार!

UPSC IPS Success Story : दरवर्षी हजारो विद्यार्थी युपीएससीची परीक्षेला बसतात. काही त्यात यशस्वीरित्या पास होतात तर काहींना अधिक मेहनत करत अपयशाशी सामना करावा लागतो. पण लकी चौहान ही पहिल्याच प्रयत्नात युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाली. सध्या ती त्रिपुरा केडरची अधिकारी आहे.

उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील खुर्जा गावात लकीचा जन्म झाला. तिचे वडील रोहताश सिंह चौहान हे व्यवसायाने प्रॉपर्टी डीलर आहेत. तर तिची आई सुमन लता चौहान शिक्षिका आहे. तिच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, लकी लहानपणापासूनच हुशार विद्यार्थी होती.

लकीने बारावीत विज्ञान शाखेची निवड केली. त्यानंतर तिने इंग्रजी साहित्य आणि इतिहास या विषयात ग्रॅज्युएशन केले. ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर लकीने सहाय्यक कल्याण प्रशासक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. मात्र, तिचे स्वप्न आयपीएस अधिकारी होण्याचे होते. त्यामुळे तिने यूपीएससी परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. दररोज नित्यनेमाने वाचन, नोट्स काढायची. नोकरी करत असताना देखील ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत होती. त्यामुळेच, तिला हे यश मिळाले आहे.

लकीला तिच्या प्रशिक्षणादरम्यानच्या कामगिरीच्या आधारे केंद्रीय गृह मंत्रालयाने त्रिपुरा केडर दिले आहे. त्यांनी आतापर्यंत राज्यात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. ती सध्या त्रिपुराच्या गोमती जिल्ह्यातील उदयपूरच्या एसपी म्हणून काम बघत आहे.

मित्रांनो, तुम्ही लहान गावात राहणारे असलात तरी मोठी स्वप्ने नक्की बघा. परिस्थितीवर मात करण्याची धमक असेल तर यश नक्कीच मिळते.

Related Articles

Back to top button