मनात जिद्द असली तर माणूस प्रत्येक संकट पार करून आपल्या यशापर्यंत पोहचतोच. त्यासाठी जोड असते अथक प्रयत्न आणि कष्टांची! जिल्ह्यातील संगमनेर येथे राहणाऱ्या केवल दारासिंग कतारी याची ही प्रेरणादायी कहाणी आहे. आता तो महाराष्ट्र पोलीस दलात पोलिस पदावर रुजू होणार आहे. मार्गातील अनेक अडथळे पार करत त्याने हे यश मिळवलं आहे. त्याच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच. पण त्याने हार मानली नाही.
कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्याने प्रसंगी आई वडिलांसोबत पोळपाट लाटणं विकलं. एव्हढंच नव्हे तर कॉलेज शिकता शिकता लग्न समारंभात वाडपी म्हणूनही काम केलं. केवल हा संगमनगरच्या संजय गांधी झोपडपट्टीत राहतो. त्याचे आई वडिल पोळपाट-लाटणे बनवण्याचे काम करतात. जत्रेत किंवा आठवडी बाजारात माल विकण्यासाठी जातात. केवल देखील त्यांच्यासोबत माल विकण्यासाठी जात असे.
केवलच्या घरी 3 भाऊ, 2 बहिणी आणि आई-वडील असा परिवार आहे. यामध्ये केवल हा सर्वात लहान मुलगा आहे. घरच्या परिस्थितीमुळे त्याचे अभ्यासात मन रमत नव्हते. तो घराजवळील सिद्धार्थ महाविद्यालयात शिक्षण घेत होता. केवल 2008 ला दहावी नापास झाला. ऑक्टोबरच्या परीक्षेला पुन्हा बसला पण पुन्हा नापास झाला. त्यानंतर पाच वर्षानी 2013 ला त्याने दहावीची परीक्षा दिली. त्यामध्ये तो पास झाला. घरची परिस्थिती अगदी बेताची होती. तो त्याच्या आई वडिलांना लाटणे, पोळपाट, चौरंग बनवायला मदत करायचा.
घरातले दोन भाऊ आणि आई वडिल असे सर्व मिळून हे काम करायचे. आता मागे हटायचं नाही हे त्याने ठरवलं आणि अकरावीला खूप मेहनत घेऊन त्याने 78 टक्के मिळवले. इयत्ता 11 वी आणि 12 वीला श्रमिक महाविद्यालय संगमनेर मधून दोन्हीवेळेस तो मुलांमधून पहिला आला. अकरावीला भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यातून दुसरा आला. 12 वीमध्ये देखील विविध स्पर्धांमध्ये त्याने पहिला क्रमांक पटकावला. मतदान जनजागृती स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून त्याने तिसरा क्रमांक मिळवला. बारावी बो च्या परिक्षेत त्याला 76 टक्के गुण मिळाले.
दरम्यान त्याने पोलीस भरती (Police Bharti) परीक्षेची तयारी सुरु केली. 2018 ला पहिली पोलीस भरतीची परीक्षा दिली. त्यावेळी 176 चा कट ऑफ लागला पण त्याला 170 गुण मिळाले होते. परीक्षेत यश मिळाले नाही पण परीक्षेचे स्वरुप आणि अभ्यासक्रम काय असतं हे त्याला समजलं होतं. त्याने 2019 मध्ये पूर्ण तयारी केली पण तेव्हा लॉकडाऊन लागला. त्यानंतर त्याने अभ्यास बंद केला आणि बियर बारमध्ये वेटरचे काम केले. लहानपणापासून तो लग्न समारंभात वाडपीचे काम करत आला आहे.
लॉकडाऊनमुळे 2019 ची भरती 2021 ला झाली. शेवटचे 3 महिने अभ्यासाला मिळाले. त्यावेळी पेपर कठीण गेला. लेखी परीक्षेत 68 गुण मिळाले. पण मेरीट 74 ला बंद झाली. दरम्यान जानेवारी 2022 पूर्णपणे अभ्यासावर लक्ष केंद्रीत केलं. सकाळी उठून मैदानी सराव, त्यानंतर दुपारी क्लास, संध्याकाळी अभ्यास आणि रात्री त्याला लाटणी पोळपाट बनवण्याच्या कामावर लक्ष द्यावे लागायचे.
हे काम पूर्ण बंद करुन त्याने पोलीस भरतीच्या अभ्यासावर लक्ष दिलं. सप्टेंबरमध्ये पोलीस भरती निघाली. त्यावेळी त्याने फॉर्म भरला. नगरपालिकेच्या लायब्ररीत अभ्यास करण्याचा निर्णय घेतला; पण तेथे भरायला पैसे नव्हते म्हणून लायब्ररीतून त्याला प्रवेश नाकारला गेला. केवल रात्री 3 वाजेयपर्यंत अभ्यास करायचा. हाती घेतलेला विषय पूर्ण वाचून झाल्याशिवाय तो पुस्तक खाली ठेवायचा नाही. घरुन 10 रुपये घेऊन अभ्यासाला बाहेर पडायचा. त्यात 2 बिस्किट पुडे घेऊन जायचा आणि तोच नाश्ता म्हणून खायचा. या परिक्षेत त्याला मैदानी चाचणीत 36 आणि लेखी परिक्षेत 81 असे एकूण 117 गुण मिळाले आहेत.
“पोलिस भरती परीक्षेच्या निकालादिवशी संध्याकाळी 7 वाजता पास उमेदवारांची यादी जाहीर झाली. माझ्या एका मित्राने फोनवरुन माझं नाव यादीमध्ये आलं आहे असं सांगितलं. ही बातमी आईला सांगितल्यानंतर तिला हसू की रडू हे कळत नव्हते. पोलीस भरतीची तयारी करताना माझ्यावर कोणाला विश्वास नव्हता. पण मी सगळ्यांकडे दुर्लक्ष केलं आणि मेहनत करत राहीलो. आईने वेळप्रसंगी वडिलांशी भांडण करुन मला अभ्यासाला प्रोत्साहन दिले. त्यामुळे या यशाचे श्रेय आईला जाते;” असे केवल सांगतो.