⁠
Jobs

तयारीला लागा : राज्यातील गृह विभागात लवकरच 7 हजार पोलिसांची भरती

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी बातमी आहे. राज्यातील गृह विभागात लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. विधानसभेत लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील विविध शहरांमध्ये पोलीस विभागात मनुष्य बळ कमी पडत आहे. मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आणखी सात हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पहिल्यांदाच होणार शारीरिक चाचणी
शासनाने महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण 50 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर धावणे (20 गुण), 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण तर महिला उमेदवार 800 मीटर धावणे (20 गुण). 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण असणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरूष) पदासाठीशारीरिक चाचणी एकूण 100 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 5 कि.मी. धावणे (50 गुण), 100 मीटर धावणे (25गुण), गोळाफेक (25 गुण) असे एकूण 100 गुण असणार आहेत.

शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील, लेखी चाचणीमध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुध्दीमत्ता चाचणी मराठी व्याकरण या विषयावर आधारीत प्रश्न असतील. लेखी चाचणी मध्ये विचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील. परीक्षामराठी भाषेत घेण्यात येईल. तसेच या लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटे असेल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40 टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40 टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. सदरहू पोलीस भरतीमधील लेखी परिक्षा विशेष बाब म्हणून OMR (Optical Mark Recognition) पध्दतीने घेण्याबाबत शासनाने मान्यता दिलो आहे.

Related Articles

Back to top button