आज वडील हयात नसले तरी लेकीने केले वडिलांचे स्वप्न पूर्ण; मोना झाली RFO
मोनाने अधिकारी व्हावे, असे तिच्या वडिलांची इच्छा होती.
आज ते नसले तरी मोनाने वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे.
तिचा हा प्रेरणादायी धाडसी प्रवास…
मोना विजय बेलवलकर ह्या कोल्हापूरातील जयसिंगपूर येथील आहेत. बारावीला असताना त्यांच्या वडिलांचं निधन झाले. त्यानंतर मोना यांच्या आई आणि मोठ्या बहिणीने त्यांना धीरानं वाढवले. वडिलांचा लवकर मृत्यू झाल्यामुळे आईवर घरची जबाबदारी पडली. त्यामुळे, कुठे मोठ्या शहराच्या ठिकाणी न जाता मोनाने जयसिंगपूर मधूनच स्पर्धा परीक्षेला सुरूवात केली. त्यामुळे या यशात तिच्या आई आणि मोठ्या बहिणीचा मोठा वाटा आहे.
तिचे शालेय शिक्षण हे जनतारा कल्पवृक्ष विद्यामंदिर, जयसिंगपूर इथे झाले आहे. तर महाविद्यालयीन शिक्षण जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर या ठिकाणी पूर्ण केले. तर सांगलीच्या कस्तुरबा महाविद्यालयातून बीएससीची पदवी त्यांनी पूर्ण केली. महाविद्यालयीन जीवनात त्यांना महाराणी ताराबाई पुरस्कार देखील मिळाला आहे. लहानपणापासून विविध शालेय परीक्षा, स्कॉलरशिप व फेलोशिप अशा परीक्षांमध्ये मोना नेहमीच प्रयत्नशील होती.या सोबत त्यांनी एनसीसी मार्फत महाराष्ट्र राज्याबाहेर देखील प्रतिनिधित्व केले आहे. तबला वादन असो की पोवाडा सादर करणे, बाईक चालवणे असो की हिमालयातील कॅम्प अशा विविध क्षेत्रात मोनाने ठसा उमटविला आहे.
त्यामुळे, आपण पण स्पर्धा परीक्षा द्यायला हवी. हे तिने मनाशी पक्के केले आणि २०१८ पासून स्पर्धा परीक्षांची तयारी चालू केली. या काळात त्यांनी अभ्यास करत असताना शिक्षिका म्हणून अनुभव देखील घेतला. साधारण दोन वर्षांपूर्वी सहाय्यक प्राध्यापिका म्हणून नोकरीही केली. सकाळी नोकरी करून दुपार नंतर वाचनालयात नियमितपणे जाऊन अभ्यास सातत्याने केला. एमपीएससीच्या मुलाखतीसाठी त्यांनी विशेष केली आणि याच मेहनतीच्या जोरावर तिची RFO म्हणून निवड झाली. या परीक्षेत मुलींमध्ये राज्यात तिसरी येण्याचा बहुमान मिळवला आहे.