MPSC Dysp Success Story : आपल्याला उच्च शिक्षण आणि उच्च पद मिळावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण नोकरी सांभाळत अभ्यास कसा करावा? हे प्रत्येकाच्या पुढच्या प्रश्न असतो. तसेच, अमोल रामचंद्र मोहिते यांनी नोकरी सांभाळत अभ्यासातील सातत्य ठेवत जिद्द चिकाटीच्या जोरावर स्पर्धा परीक्षेमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी (डीवायएसपी) या पदाला गवसणी घातली आहे.
अमोल यांच्या यशात आई शोभा मोहिते, वडील माजी सैनिक रामचंद्र मोहिते आणि पत्नी पूजा मोहिते (नायब तहसीलदार) याची मोलाची साथ मिळाली आहे.अमोल मोहिते यांचे प्राथमिक शिक्षण काटी गावातील जिल्हा परिषदेच्या भरतवाडी या शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण काटी गावातील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री काटेश्वर विद्यालयात, अकरावी बारावी बारामती येथील टीसी कॉलेजमध्ये तर पुणे येथील कृषी महाविद्यालयात पदवीचे शिक्षण पूर्ण झाले.
अमोल हे मूळचे इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथील रहिवासी.सध्या मुंबई येथे सहाय्यक राज्यकर आयुक्त पदावर कार्यरत आहेत.त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर स्पर्धा परीक्षेचा निर्णय घेतला. त्यानंतर चिकाटीने अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, मोहिते यांनी पदवी घेतल्यानंतर २०१४ मध्ये पहिल्याच प्रयत्नात २३ व्या वर्षी राज्यकार निरीक्षक हे पद प्राप्त केले. या वर्षामध्ये स्पर्धा परीक्षेतून सर्वात कमी वयामध्ये अधिकारी होण्याचा मान त्यांनी मिळविलेला होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली. दररोज सकाळी सहा ते नऊ आणि ऑफिस सुटल्यानंतर सायंकाळी सहा ते नऊ असा दररोज सहा तास आणि सुट्टीच्या दिवशी दहा तास अभ्यासात सातत्य ठेवले होते. याच मेहनतीच्या जोरावर राज्य लोकसेवा आयोग २०२२ या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये अमोल मोहिते यांना राज्यात ५७ वी रँक मिळाली असून त्यांची उपविभागीय पोलिस अधिकारी या पदावर निवड झाली आहे.