लोकांच्या दारोदार मटिकी विकून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करणाऱ्या दाम्पत्याच्या मुलीने आई-वडीलांच्या कष्टाची जाण ठेऊन मोठी झेप घेतली. महाराष्ट्र लोकसवा आयोगच्या परिक्षेत उत्तीर्ण होऊन पोलिस उपनिरिक्षक पदाला (पीएसआय) गवसणी घातली. लक्ष्मी चौधरी (सासरकडचे आडनाव) अशा या मुलीचे नाव.
पारनेर तालुक्यातील पहूर गावची लक्ष्मीने 2017 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा दिली होती. त्याचा निकाल 8 मार्च या दिवशी लागला. जागतिक महिला दिनाच्या दिवशीच लक्ष्मीला आनंदाची बातमी मिळाली. लक्ष्मी सध्या एरंडोल गावात म्हणजे तीच्या सासरी राहते. पीएसआय ची परिक्षा उत्तीर्ण झाल्याने सर्वच क्षेत्रातुन तीचे कौतुक केले जात आहे.
लक्ष्मीचे वडील सुरेश करंकाळ आणि आई अजूनही पहूर येथे दररोज सकाळी घरोघरी मटकीची विक्री करून आपल्या परिवाराचा चरितार्थ भागवत आहेत. अशा अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत असतांना देखील आपल्या मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिल्यामुळेच आज लक्ष्मीला हे यश मिळाले आहे. लक्ष्मी चार बहिणी आणि एक भाऊ आहे. लहान पणापासूनच हुशार असल्यामुळे त्यांना शिक्षणासाठी आई-वडिलांनी प्रोत्साहन दिले. बीएडीएडचे शिक्षण पुर्ण करून तिन वर्ष जळगाव येथील ‘दीपस्तंभ’ स्पर्धा परीक्षा केंद्रात लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरु केली होती. स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु असतांनाच एक वर्षापूर्वी एरंडोल येथील राहुल चौधरी यांच्या तीचा विवाह झाला. विवाहानंतरही सासरच्या सर्व नातेवाईकांनी त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले.
लक्ष्मी यांचे राहुल चौधरी हे सिक्कीम येथे सिपला या औषध कंपनीत अधिकारी पदावर कार्यरत आहेत. लक्ष्मी चौधरी उत्तीर्ण झाल्याची माहिती शहरात पसरताच विविध महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
आई-वडील, पती, सासु, सासरे, बहिण, मेहुणे व गुरुजनांना याचे सारे श्रेय जाते. लग्नापूर्वी माझ्या आई-वडिलांनी खुप कष्ट करून मला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. लग्नानंतर पती राहुल व सासू-सासरे यांनी देखील पुढील शिक्षणासाठी माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. त्यामुळेच हे यश प्राप्त करू शकले.
– लक्ष्मी चौधरी