⁠  ⁠

एमपीएससी : गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा इतिहास

Chetan Patil
By Chetan Patil 4 Min Read
4 Min Read

गट क सेवांच्या पूर्वपरीक्षेमध्ये इतिहास घटकाचा अभ्यासक्रम ‘आधुनिक भारताचा विशेषत महाराष्ट्राचा इतिहास’ अशा प्रकारे विहित करण्यात आला आहे. या घटकाची तयारी कशा प्रकारे करावी याची चर्चा या लेखामध्ये करण्यात येत आहे.

इतिहास या घटकावर साधारणपणे १२ ते १५ प्रश्न विचारले जातात. सन २०१८ ची प्रश्नपत्रिका पाहता सर्व प्रश्न स्वातंत्र्यपूर्व कालखंडावर विचारलेले आढळतात. ब्रिटिशांचे राजकीय आणि सामाजिक धोरण, त्यांचे कायदे, १८५७चा उठाव, सामाजिक सुधारणा चळवळी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशने व आंदोलने, समांतर संघटना व त्यांचे लढे आणि त्यांची वैशिष्टय़े, नियतकालिके, राष्ट्रीय चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान विशेषत: फारशी चच्रेत नसलेली व्यक्तिमत्त्वे या बाबींवर भर देण्यात आलेला आहे. उपघटकनिहाय तयारी करताना पुढील बाबी लक्षात घ्यायला हव्यात.

ब्रिटिशांचे राजकीय धोरण, त्यांचे विविध नागरी व राजकीय निर्णय / कायदे, महत्त्वाचे व्हाइसरॉय / गव्हर्नर जनरल व त्यांचे ठळक निर्णय या बाबींचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

स्वातंत्र्यपूर्व इतिहास

१८५७चा उठाव हा स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील मलाचा दगड आहे. त्यामुळे या बाबतचे सर्व मुद्दे बारकाईने अभ्यासावेत. सहभागी सामाजिक प्रवर्ग, त्यामागची कारणे, उठावाची सामाजिक – राजकीय कारणे, तात्कालिक कारणे, व्याप्ती, विविध नेते, त्यांचे कार्यक्षेत्र व उठावादरम्यान वा नंतरची त्यांची स्थिती, महत्त्वाच्या घोषणा

सन १९०९, १९१९, १९३५ व १९४७ च्या कायद्यांमधील महत्त्वाच्या तरतुदी समजून घ्यायला हव्यात

आणि त्यावरील महत्त्वाच्या भारतीय नेत्यांच्या प्रतिक्रिया व तरतुदींचे परिणाम समजून घ्यायला हवेत. इतर ब्रिटिश कायद्यांच्या ठळक बाबी माहीत करून घ्याव्यात.

व्हाईसरॉय / गव्हर्नर जनरल यांचे निर्णय कालानुक्रमे माहीत असावेत. तसेच ठळक निर्णयांचे परिणाम व त्यावरील भारतीयांच्या प्रतिक्रिया माहीत करून घ्याव्यात.

ब्रिटिशांच्या धोरणांवर भारतीयांच्या प्रतिक्रिया, राजकीय संस्था / संघटनांची स्थापना आणि कार्ये यांचा आढावा घ्यावा. या संघटनांचा अभ्यास पुढील मुद्दय़ांच्या आधारे टेबलमध्ये नोट्स काढून करावा – स्थापना वर्ष, ब्रीदवाक्य, असल्यास मुखपत्र, स्थापना करणारे तसेच महत्त्वाचे सक्रिय नेते व त्यांची उल्लेखनीय कामगिरी, यांचा आढावा घ्यावा.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, तीन ठळक कालखंड, त्यांतील महत्त्वाची अधिवेशने व ठराव, आंदोलने, त्यांचे स्वरूप व परिणाम यांचा आढावा घ्यायला हवा.

सशस्त्र / क्रांतिकारी चळवळींचे दोन कालखंड, त्यांतील महाराष्ट्र, पंजाब व बंगालमधील क्रांतिकारक, त्यांच्या संघटना, महत्त्वाच्या घडामोडी, दैनिके / नियतकालिके, पुस्तके यांच्या टेबलमध्ये नोट्स काढता येतील.

यामध्ये महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळीतील वैशिष्टय़पूर्ण बाबी समजून घ्याव्यात. उदाहरणार्थ साताऱ्याचे ‘पत्री’ सरकार, नाटकांचा प्रचारासाठी उपयोग, इत्यादी. महाराष्ट्रामध्येच सक्रिय असलेल्या संघटना तसेच त्यांचे नेते व कामगिरी यांचा बारकाईने आढाव घ्यायला हवा.

या कालखंडातील महाराष्ट्रातील नेते, घडामोडी, आंदोलने, राजकीय संस्था यांचा जास्त बारकाईने आढावा घ्यायला हवा. नागपूरचा झेंडा, सत्याग्रह यांसारखे महाराष्ट्रातील वैशिष्टय़पूर्ण योगदान माहीत असायला हवे.

देशातील आणि महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारकांचा अभ्यास करीत असताना पुढील पलूंचा विचार केल्यास लक्षात ठेवणे सोपे जाते – जन्म ठिकाण, मूळ ठिकाण, शिक्षण, नोकरी / व्यवसाय, स्थापन केलेल्या संस्था, वृत्तपत्रे, पुस्तके, महत्त्वाचे लिखाण, भाषण, घोषणा. प्रबोधन कार्यासाठी दिलेले विशेष योगदान. या मुद्दय़ांच्या नोट्स कालानुक्रमे काढल्यास उजळणी करताना क्रम लक्षात ठेवणे सोपे जाते.

सामाजिक प्रबोधनाबरोबरच धार्मिक सुधारणांचाही यामध्ये समावेश करणे आवश्यक आहे.

स्वातंत्र्योत्तर कालखंड

स्वातंत्र्योत्तर कालखंडावर सन २०१८मध्ये प्रश्न विचारलेला नाही. मात्र कर सहायक, लिपिक टंकलेखक आणि दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क या पदांच्या स्वतंत्र परीक्षांमध्ये पूर्वी या उपघटकावर प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामुळे या कालखंडावर प्रश्न विचारले जाण्याची अपेक्षा ठेवावी लागेल.

*या कालखंडामधील परराष्ट्र धोरण विशेषत: अलिप्ततेचे धोरण, इंदिरा गांधींच्या कलातील युद्धे व आण्विक धोरण, संयुक्त महाराष्ट्र चळवळ व त्यातील सर्व बारकावे, पहिल्या पाच पंचवार्षिक योजना व त्यातील महत्त्वाचे निर्णय / प्रकल्प यांचा आढावा घेणे आवश्यक आहे.

या घटकाचा अभ्यास करण्यासाठी स्टेट बोर्डाची आधुनिक भारताच्या इतिहासाची माहिती असणारी पुस्तके, आधुनिक भारताचा इतिहास हे ग्रोव्हर आणि बेल्हेकर यांचे पुस्तक, अनिल कठारे यांचे पुस्तक तसेच, बिपिन चंद्र यांचे ‘इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेन्डन्स’ आणि ‘इंडिया सिन्स इंडिपेन्डन्स’ ही पुस्तके अभ्यासोपयोगी आहेत. प्रश्नांच्या सरावासाठी राष्ट्रचेतनाचे गट क सेवा अभ्यास प्रश्नपत्रिका हे पुस्तक उपयुक्त ठरू शकेल.

  • फारुक नाईकवाडे
    सदर लेख हा दैनिक लोकसत्तामधील आहे
Share This Article