सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांना राज्य सरकारने खूशखबर दिली आहे. तो म्हणजे काल गुरुवारी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) च्या कक्षेबाहेरील गट- ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड पदभरतीसाठी परीक्षा TCS, IBPS मार्फत नामनिर्देशनाद्धारे घेण्याचा निर्णय झाला. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे ७५ हजार रिक्त पदे भरतीचा मार्ग सुकर झाला आहे.
मागील वर्षाच्या कालावधीत परीक्षांसंदर्भात झालेल्या विविध घोटाळ्यांच्या संदर्भात टीसीएस- आयओएन, आयबीपीएस या कंपन्यांना नामनिर्देशनाने काम सोपवावे असे ठरले होते. त्याप्रमाणे भूतपूर्व महाराष्ट्र दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील सरळ सेवेची रिक्त पदे ऑनलाईन पद्धतीने वरील संस्थांमार्फत घेण्याचा निर्णय झाला.
या कंपन्यांची नामनिर्देशनासह निवड झाल्यानंतर परीक्षांची कार्यपद्धती व इतर अटी शर्ती सामान्य प्रशासन विभाग (सेवा) यांच्यामार्फत निश्चित करण्यात येतील. माहिती तंत्रज्ञान विभागातील तज्ज्ञांची राजपत्रित पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेतून वगळण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
यामुळे नव्याने निर्माण करण्यात आलेली माहिती तंत्रज्ञान प्रशासक आज्ञावली तज्ज्ञ (गट-अ) तसेच आज्ञावली तज्ज्ञ (गट-अ), सहायक आज्ञावली तज्ज्ञ (गट-ब) अशी ३ राजपत्रित पदे आयोगाच्या कार्यकक्षेतून वगळली जाणार आहेत. तसेच या पदाचे सेवाप्रवेश नियम स्वतंत्रपणे तयार करण्यात येणार आहेत.