MPSC PSI Success Story : सर्वसामान्य ग्रामीण भागात मुलींची लवकर लग्न होतात. यामुळे, त्यांची स्वप्ने अपुरीच राहतात. पण वर्दीला लय किंमत असते, रुबाब असतो. आपल्या खानदानात कोणी अधिकारी नाही. त्यामुळे अधिकारीच बन, हे पूजाला तिच्या पतीने व सासरच्या मंडळींनी सांगितले. तिने देखील जिद्दीने अहोरात्र मेहनत करण्याचा ध्यास घेतला. पूजाचे बिगारीकाम आणि मोलमजुरी करणारे कामगार. माहेरी आणि सासरी दोन्हीकडे अठराविश्व दारिद्र्य.
मूळात पूजा ही वाघळवाडीतून वाणेवाडीत स्थलांतरित झालेल्या माणिक व सुमित्रा गायकवाड या दांपत्याची मुलगी. वाघळवाडी जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक, सोमेश्वर विद्यालयात माध्यमिक; तर न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडीत उच्च माध्यमिक शिक्षण घेतानाच हुशारीची चुणूक दिसली.बारावीनंतर शारदानगरला पोलिस अकादमीत वर्षभर अभ्यास केलेलाच होता. पती राहुल याच्या आग्रहाने सन २०१९मध्ये करंजेपूलच्या विवेकानंद अभ्यासिकेत जाऊन अभ्यास सुरू केला.पतीने तिची हुशारी हेरली आणि ‘फक्त वर्दी मिळव’ एवढाच हट्ट धरून सावलीसारखा हरघडीला सोबत उभा राहिला. तिनेही सलग पाच वर्ष सातत्यपूर्ण कष्ट घेतले. पुढे, तिने काकडे महाविद्यालयात राज्यशास्त्र विषयात पदवी मिळवली.
त्यानंतर दिवसरात्र मेहनत घेऊन अभ्यास सन २०२१च्या पीएसआयच्या प्राथमिक परीक्षेत, तर २०२३च्या मुख्य परीक्षेत अडकली. मात्र, घरच्या पाठिंब्याने सन २०२२च्या परीक्षेत बाजी मारली. मैदानी सराव, आहाराची सोय हे त्याने न थकता केले.वाणेवाडीत पीएसआय झालेली ती पहिली महिला ठरली आहे.