MPSC Success Story : आश्विनी शिवाजी वनवे यांच्या कुटुंबाची परिस्थिती जेमतेम असताना अत्यंत मेहनत, जिद्द, चिकाटीने अश्विनीने अभ्यास केला.मातृतीर्थ सिंदखेड राजा तालुक्यातील जिजाऊच्या लेकीने पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होवून पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे.खरंतर क्षमता असतानाही ग्रामीण भागातील मुली शिक्षणापासून वंचीत राहत आहेत. पालकांनी मुलांबरोबरच मुलींनाही शिकवले पाहिजे. जर त्यांना शिकवले तर झेप घेऊ शकतात.हे अश्विनीने दाखवून दिले आहे.
तिच्या यशामध्ये तिचा भाऊ योगेश वनवे यांचा मोठा वाटा आहे. योगेश वणवे हे सैन्य दलामध्ये कॅप्टन या पदावर कार्यरत आहे. त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन व प्रेरणा दिली.तिचा गावातच जन्म झाला असल्यामुळे हनवतखेड येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. माध्यमिक व उच्च माध्यमिक व पुढील शिक्षण तालुक्याच्या ठिकाणी पूर्ण केले.बीएची २०१९ मध्ये पदवी पूर्ण केली. पदवी पूर्ण होताच एमपीएससीची पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर मुख्य परीक्षेसाठी तयारी सुरू केली. स्पर्धा परीक्षेकरता सुरुवातीला पुण्यामध्ये क्लास जॉईन केला. त्यामुळे अभ्यासाची दिशा मिळाली.
स्पर्धा परिक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी सातत्य अभ्यासांचे योग्य नियोजन करणे आवश्यक असते. तेच तिने अहोरात्र मेहनत करून वयाच्या २५ व्या वर्षी पोलीस उपनिरीक्षक परीक्षा उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे.अश्विनी वनवे यांची संपूर्ण महाराष्ट्रातील रँक २९९ असुन खुल्या महिला प्रवर्गातून १६ वी रँक आहे.