लग्नानंतर फक्त चूल आणि मूल यात न पडता. शिक्षणासाठी कास धरली की यश मिळते. हे शिरूर तालुक्यातील आमदाबाद येथील सारिका इचके-जाधव हिने करून दाखवले आहे. तिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली.चांगुणा व बाळासाहेब जाधव या शेतकरी दाम्पत्याची कन्या आहे. आपल्या कन्येने उच्च शिक्षण घेऊन मोठे अधिकारी व्हावे, असे त्यांना मनोमन वाटत होते.
तिचे शालेय शिक्षण हे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आमदाबाद व माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल मलठण येथे पूर्ण केले आणि पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातून संगणक इंजिनिअरिंग पदवी प्राप्त केली.आपल्या आईवडिलांचे काबाडकष्ट सारिका हिने पाहिले होते. त्यामुळे आपण वरिष्ठ अधिकारी बनायचे, ही खूणगाठ तिने मनाशी बांधली होती.
पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिचे लग्न झाले. सासरच्या मंडळींनीही शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. लग्नानंतर तिने संसाराची जबाबदारी पार पाडत जोमाने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु ठेवली. संसार सांभाळून स्पर्धा परीक्षेची तयारी करणे सोपे नाही पण तिने करून दाखवले. पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घालत, सासर व माहेर दोन्ही घराण्याचे नाव उज्ज्वल केले.