वडिलांचे स्वप्न झाले पूर्ण; लेकीच्या अंगावर अभिमानाची वर्दी!
MPSC Success Story : आपण स्वप्न उराशी असेल तर ते पूर्ण होतेच.वाघळवाडीतल्या लेकीने अभ्यासाच्या बळावर खाकी वर्दी मिळवली. मयुरी सावंत ही बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे राहणारी रहिवासी. वडील महादेव सावंत हे क्रीडाशिक्षक. स्पर्धा परिक्षेतून पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंत जाण्याचा त्यांनीही प्रयत्न केला होता. त्यामुळे मुलीने पोलिस अधिकारी व्हावे अशी त्यांची इच्छा होती. त्यानुसार तिची जडणघडण होती. तसेच तिला आधीपासूनच खेळाची आवड होती.
मयुरीचे पहिलीपासून बारावीपर्यंतचे शिक्षण हेवाघळवाडीतील उत्कर्ष आश्रम शाळेत झाले. बारावीनंतर माळेगावच्या शिव विद्या प्रसारक मंडळ कॉलेजमध्ये बी. ई. मेकॅनिकलची पदवी प्राप्त केली. शाळेत शिकत असतानाच पोलिस वर्दीचे आकर्षण वाटत होते. आई-वडिलांचे वर्दीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मयुरी मागील सहा वर्षांपासून सातत्याने अपार परिश्रम घेत होती. पहिल्या तीन प्रयत्नांना अपयश आले. त्यासाठी तिने बारा बारा तास सातत्याने अभ्यास केला.
खेळाची आवड असल्याने मैदानी चाचणीत पैकीच्या पैकी गुण मिळाले. अभ्यासिकेत शिक्षकाच्या देखरेखीखाली अभ्यास चांगला व्हायचा. दुपारच्या थोड्या विश्रांतीनंतर रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचे. मोबाईल गरजेपुरताच वापरला. विवेकानंद अभ्यासिकेमध्ये दररोज सातत्यपूर्ण अभ्यास करत राहिली. २०२० मधील पीएसआयची परीक्षा दिली होती. तिला मुख्य परिक्षेत २४६ गुण होते तर मैदानी चाचणीत चक्क शंभरपैकी शंभर गुण मिळवले. मुलाखतीत १८ गुण मिळाले. विशेष म्हणजे २०२१ च्या पीएसआय परिक्षेतही ती यशस्वी ठरली.चौथ्या प्रयत्नात मयुरीने पोलिस उपनिरीक्षक पद कवेत घेतले.मयुरी सावंत हिने आपले खाकी वर्दीचे पाहिलेले स्वप्न सत्यात उतरविले आहे.