MPSC PSI Success Story प्रशांतराज जाधव याचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याच्या दक्षिणेकडे सीतामाईच्या डोंगरदऱ्यात वसलेले उपळवे आहे. घरचे संपूर्ण कुटुंब हे शेतीवर अवलंबून होते. घरी शेती हेच प्रमुख उत्पादनाचे साधन. नगदी पिके तर सोडाच खरीप आणि रब्बी पिकांवर दिवस काढावे लागत असे. याही परिस्थितीत त्याच्या आई – वडिलांनी त्याला उच्च शिक्षित केले आणि अधिकारी बनण्यासाठी प्रोत्साहन दिले.
त्याचे पाचवीपर्यंत प्राथमिक शिक्षण गावामध्येच झाले. अजून चांगले शिक्षण मिळावे म्हणून वडिलांनी त्याला सहावीमध्ये असताना साताऱ्याच्या शाहू बोर्डिंग येथे घातले. हे रयत शिक्षण संस्थेद्वारे चालवले जाणारे वसतिगृह होते. येथे गोरगरीब आणि कष्टकरी, अनाथ मुलांसाठी राहण्याची व शिक्षणाची सोय करून दिली जाते. यात प्रशांत यांनी देखील कमवा व शिका या योजनेअंतर्गत शिक्षण पूर्ण केले. त्याचे सहावी- सातवीचे शिक्षण रा. ब. काळे विद्यामंदिर येथे तर आठवी ते दहावीचं शिक्षण २०१२ मध्ये महाराजा सयाजीराव विद्यालय येथे पूर्ण केले.
तर यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा येथे बारावी पूर्ण केली. सायन्य शाखा घेतल्यामुळे इंजिनियरिंग आणि मेडिकल हे दोन्ही मार्ग उपलब्ध होते. पण सीईटीला कमी मार्क आल्यामुळे मेडिकलला प्रवेश घेणं अशक्य झाले.म्हणून त्याने सातारच्याच अरविंद गवळी कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला. हा इंजिनिअरिंगचा प्रवास हा महत्त्वाचा होता. यात सामाजिकदृष्ट्या जाणीवा निर्माण झाल्या. त्याचे एन.एस.एस अंतर्गत पोलिस प्रशासनाची जवळचा संबंध झाला. तेव्हाच त्याने ठरवले की आपणही असं पोलीस इन्स्पेक्टर व्हावं.
यातही जर आपली बिकट परिस्थिती बदलायची असेल तर आपल्याला आता असं वेगळं काहीतरी केलं पाहिजे की, ज्यानं आपल्या आई-वडिलांचं, आपल्या गावाचं, आपल्या समाजाचं नाव मोठं होईल. म्हणूनच, प्रशांतला एकच पर्याय दिसला तो म्हणजे स्पर्धापरीक्षा उत्तीर्ण होऊन एक अधिकारी होणं. कॉलेजमध्ये असताना स्पर्धापरीक्षेच्या अभ्यासाविषयी किंचितही माहिती नसल्यामुळे इथून पुढे जर आपल्याला तयारी करायची असेल आणि कमी वेळात यश मिळवायचं असेल तर योग्य मार्गदर्शनाची गरज होती. म्हणून त्याने पुणे गाठलं.पुण्यात मार्गदर्शनासाठी नक्की कुठे जायचं? हा मोठा प्रश्न होता.
खाजगी क्लासेस मधून अभ्यासाला सुरुवात झाली. एक-एक विषय समजून घेण्यास सुरुवात केली.या अभ्यासात योग्य मार्गदर्शनाबरोबरच सेल्फ स्टडी खूप महत्त्वाचा आहे. मागील परीक्षांमध्ये आयोगाने विचारलेले प्रश्न आणि हातात असलेला अभ्यासक्रम या दोनच गोष्टी आपल्याला मार्ग दाखवत असतात. अभ्यासाचे नियोजन आणि नक्की काय वाचायचं याचे योग्य मार्गदर्शन या बळावर त्याने स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केली. त्याने २०१९ मध्ये राज्यसेवेची पहिली पूर्व परीक्षा दिली. पण यात अपयश झाले. ती परीक्षा तो दहा गुणांनी नापास झाला. अभ्यासासोबतच प्रश्न समजून घेणे, माहीत नसलेल्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं या गोष्टींची कमतरता ही त्याला जाणवली.
पुढे २०२० ची राज्यसेवा पूर्व परीक्षा दिली. त्यात तो पास झाला. यातच संयुक्त परीक्षेला देखील सामोरे गेलात.परंतू त्यानंतर संपूर्ण जगाला कोरोनाच्या संकटानं घेरलं. पुढे लॉकडाऊनमुळे एक ते दीड वर्ष परीक्षा झाली नाही. सप्टेंबर २०२१ मध्ये पीएसआयची पूर्व परीक्षा झाली. त्यामध्ये तो उत्तीर्ण झाला. प त्याची मुख्य परीक्षा नोव्हेंबर २०२२ मध्ये झाली, ती पास होऊन २०२३ च्या फेब्रुवारी महिन्यात PSI ची मैदानी चाचणी पार पडली व मार्च २०२३ मध्ये मुलाखती झाल्या. आणि शेवटी ४ जुलै रोजी निकालाची प्रतिक्षा संपली. पाच वर्षाच्या मेहनतीला फळ मिळाले आणि प्रशांतराज पी.एस.आय अधिकारी झाला.