लिंबोटा येथील अल्पभूधारक शेतकरी दत्तू दादाराव कराड व सुवर्णमाला यांना दोन मुले व दोन मुली यांचे शिक्षण पूर्ण करणे म्हणजे तारेवरची कसरत पण आपण स्वतः दत्तू कराड व पत्नी सुवर्णमाला निरक्षर असल्याने आपल्या मुलांनी शिक्षण घेवून स्वतः च्या पायावर स्वाभिमानाने उभे राहावे ही मनोमन इच्छा होती. त्यामुळे त्यांनी मुलांना पूर्णपणे पाठिंबा दिला.
राणी कराड हिचे बारावी पर्यंतचे शिक्षण गावातच असलेल्या संत भगवानबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक मध्ये पूर्ण केले. दहावीला चांगले मार्क्स पडल्याने सर्वांनी सांगितले की, तू सायन्स घे, कला शाखेत मध्ये काही नसते पण लहानपणापासून आपण सरकारी नोकरी मध्ये अधिकारी झाले पाहिजे हे स्वप्न उराशी बाळगून राणीने अकवीला कला शाखेत (आर्ट्स) प्रवेश घेतला.
यानंतर लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात बीएची पदवी घेत असताना स्पर्धा परिक्षेची तयारी सुरू केली. यासोबतच तिने इतरही परीक्षा द्यायला सुरुवात केली. २०१७ पासून सलग सहावेळा प्रिलेम परिक्षा पास झाली पण मुख्य परिक्षेचा अडथळा दूर होत नव्हता. पण काही झाले तरी हार मानायची नाही, असे ठरवले असल्याने अभ्यासात सातत्य ठेवले.
२०२४ मध्ये पुणे जिल्हा तलाठी परिक्षेसाठी जाहिरात निघाली व या परिक्षेत यश मिळाले. तलाठी म्हणून जॉईनींग घेतली. याच कालावधीत २०२२ मध्ये स्पर्धा परिक्षेतंर्गत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी परिक्षा झाली यात तिला यश मिळाले. राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पीएसआय परिक्षेत आँगस्ट मध्ये लागलेल्या निकालात एनटी डी महिला प्रवर्गातून राज्यात पहिल्या क्रमांकाने पास होऊन फौजदार झाली आहे