MPSC PSI Success Story : आपली स्वप्ने व दिशा ही पक्की उराशी असेल तर यश नक्कीच मिळते. शेतकरी कुटुंबात जडणघडण झालेल्या सुनीलने पीएसआय होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आणि ते साकार झाले. नुसते साकार झाले नाहीतर सुनिल खचकड हा राज्यात पहिला आला.
सुनील हा मूळचा वाशिम जिल्ह्यातील असून तो शेतकरी कुटुंबातील आहे. वाशीम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ असलेल्या रंजितनगर लभान तांड्यावरचा हा लेक. सुनीलच्या घरी पाच एकर कोरडवाहू जमीन असून तीही खडकाळ आहे.
कला शाखेतून पदवी मिळवलेला सुनील पाच वर्षांपासून स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहे.तो २०१७ पासून छत्रपती संभाजीनगर येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता.कालावधीत त्याने सन २०१८ आणि २०१९ साली पीएसआय पदाची परीक्षा दिली. मात्र, दोन्ही वेळा त्याला यशाने थोडक्यात हुकलावणी दिली. सन २०२० साली त्याने तिसऱ्यांदा परीक्षा दिली. आता तिसऱ्या वेळी सुनीलचे पीएसआय होण्याचे स्वप्न साकार झाले आहे. त्याला ४२७ गुण आहेत.‘एमपीएससी’ने २०२० मध्ये घेतलेल्या पीएसआय पदाच्या परीक्षेच्या निकालाची विद्यार्थ्यांना अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. आता प्रतीक्षा संपली. निकालात छत्रपती संभाजीनगरातून सुनील खचकड हा राज्यातून पहिला आला आहे.