MPSC PSI Success Story उजमाला लहानपणापासून पोलिस खात्याची आवड होती. त्यांच्या घरी सय्यद नावाचे पीआय घरी येत असे. ते तिला अभ्यास करताना पहात आणि नेहमी म्हणत तू स्पर्धा परीक्षेत उतर, तुला नक्कीच यश मिळेल. तिने देखील मेहनत करून स्पर्धा परीक्षेचा निर्णय पक्का केला.
आष्टी शहरातील करीमभाई भंगारवाले यांची नात उजमा सलीम शेख पोलिस सब इन्स्पेक्टर बनली आहे. तिचे वडील ती सहा वर्षांची असताना देवाघरी गेले मुलांचा स्वयंपाक बनविण्यासाठी मिळणाऱ्या रोजंदारीतून आईने आपल्या मुलीला शिकवून मोठ्या कष्टातून पीएसआय बनविले आहे. वडील हयात नसताना आईने संघर्ष केला आणि मुलीने त्या संघर्षाला दाद देत आकाशाला गवसणी घालण्याची किमया केली आहे.
उजमाचे शालेय शिक्षण आष्टी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. दहावी, बारावी व बीसीए हंबर्डे महाविद्यालयात झाले. यानंतर स्पर्धा परीक्षेकडे लक्ष केंद्रित केले. घरात उजमानेही परिस्थितीवर मात करीत घरात लायब्ररी, अभ्यासिका बनविली. ती रोज येथेच अभ्यास करीत. याच मेहनतीच्या जोरावर संयुक्त गट ब पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा पास होत यशाला गवसणी घातली आहे. कोरोनामुळे २०२० ची परीक्षेला उशीर झाला आणि मग नंतर २०२१ मध्ये पूर्व आणि २०२२ मध्ये मुख्य परीक्षा तिने दिली.
यामध्ये ती पास झाल्यानंतर फेब्रुवारी २०२३ मध्ये तिने फिजिकल टेस्ट दिली.यामध्ये ती पास झाल्यानंतर मार्च महिन्यात तिची मुलाखत झाली. यानंतर ४ जुलै २०२३ रोजी तिचा निकाल आला. मात्र, या निकालात फक्त १ मार्क कमी असल्याने तिचं नाव प्रतिक्षा यादीत आलं. पण तिने जिद्दीने पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली होती. पण शेवटी ती प्रतिक्षा यादी १८ मार्च २०२४ रोजी जाहीर झाली. यामध्ये उजमा हिची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली. तिच्या संघर्षमय प्रवासाला यश देखील मिळाले. ‘उजमा’ने आईचा २७ वर्षांचा संघर्ष संपविला, याचा मोठा आनंद आई साहिरा सलीम शेख व तिच्या आजोबांना झाला आहे.