अजिंक्य जौंजाळ याच्या यशाची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी प्रवास आहे. अजिंक्यचे बालपण एका छोट्याशा गावात गेले. बाबुर्डी (ता. श्रीगोंदा) हे अजिंक्यचे मूळगाव. कौटुंबिक वाद – अडचणी यातून मार्ग काढत
मोठ्या मामी कविता जगताप यांनी त्याचे शिक्षण पुढे ठेवण्यास चालना दिली, तर लहान मामा सुनील जगताप व मामी राणी जगताप यांनीही त्यास मोठा आधार दिला.अजिंक्यचे पालनपोषण करण्यासाठी त्याच्या आईने सासवडमधील खासगी रुग्णालयात अनेक वर्षे काम केले. दरम्यानच्या काळात आजोबांचे निधन, कोरोनाच्या काळात आईच्या पायाची शस्त्रक्रिया आणि काही दिवसांतच मोठ्या मामाचे निधन झाल्याने घरातील कमावती व्यक्ती गेली. पुन्हा अडचणी निर्माण झाल्या. अजिंक्यने शिक्षणाचा ध्यास सोडला नाही. खरंतर अजिंक्यचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण वनपुरी येथे झाले.
दहावीला तो प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण सासवडच्या वाघिरे कॉलेजमध्ये पूर्ण केले. यानंतर त्याने स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा देखील प्रवास सोपा नव्हता अनेकदा बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागले. पैशांची चणचण असल्याने खासगी शिकवणी लावणे किंवा महागडी पुस्तके विकत घेणे अवघड असल्याने अभ्यासिकेतील पुस्तकांवरच भर देत परीक्षेचा अभ्यास केला. प्रथम दोन प्रयत्नांत त्याला अपयश आले, परंतु खचून न जाता पुन्हा जोमाने अभ्यास केला आणि तिसऱ्या प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली.