अत्यंत बिकट परिस्थितीवर मात करून आनंदने मिळविले MPSC परीक्षेत यश
MPSC Success Story : कोणतेही यश मिळवायचे असेल तर कष्ट करायला हवेच. अशीच कष्टाची तयारी ठेवल्यास आयुष्यात काहीही अशक्य नसते. हे आनंद याने दाखवून दिले आहे. आनंदची आई कलावतीचे अपघाती निधन झाले तर २०१३ मध्ये वडील लक्ष्मण यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्यावर आजी बेबाबई कांदे यांनी भावंडाचा सांभाळ केला. परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. अशा परिस्थितीवर मात करत आनंद कांदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सहायक गटविकास अधिकारी परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम आला. आनंद कांदे यांच्या यशाने गोदाकाठ भागासह तालुक्याचे नाव राज्यात रोशन केले असून ग्रामीण भागातील यश प्रामुख्याने दिसत आहे.
आनंद हा निफाड तालुक्यातील तामसवाडी या गावचा रहिवासी आहे.आनंदाचे प्राथमिक शिक्षण हे तामसवाडी येथील जनता विद्यालयात झाले. पुढील शिक्षणासाठी नाशिकमध्ये झाले. सन २०१७ मध्ये संदीप फाऊंडेशन येथून आय.टी ची पदवी प्राप्त केल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. अनेक अडचणी समोर होत्या, कौटुंबिक वातावरण तर नव्हते.तरी देखील तो अभ्यास करत राहिला.परिस्थितीला सामोरे जात आलेल्या अडचणींवर मात करत भाऊ चैतन्य व वहिनी मोनिका यांनी समर्थ साथ दिली.
आत्मविश्वास उराशी बाळगून त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी केली. २०२१ मध्ये परीक्षा दिलेल्या परीक्षेच्या निकालात आनंद कांदे यांनी सहायक गटविकास अधिकारी गट ब मध्ये महाराष्ट्रामध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला. तामसवाडी गावासह तालुक्याचे नाव रोशन केले आहे.जिद्द, चिकाटी आणि अभ्यासातील सातत्याच्या जोरावर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कुटुंबीयांचे स्वप्न साकारले. सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश येते, हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सहायक गटविकास अधिकारी परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम आलेल्या ग्रामीण भागातील तरुण देखील यशाची पायरी गाठवू शकतो हे या युवकाने दाखवून दिले आहे.