⁠  ⁠

MPSC : सेल्फस्टडी करत शेतकऱ्याच्या लेकीने गाठले यशाचे शिखर, दुय्यम निबंधक पदावर झाली नियुक्ती

Chetan Patil
By Chetan Patil 3 Min Read
3 Min Read

पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये महागडे क्लासेस लावल्यानंतरच नोकरी मिळते अशी अनेकांची विचारधारा आहे. परंतू त्याला फाटा देत जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथील भारती रविंद्र पाटील हीने एमपीएससीच्या परिक्षेत ओबीसी महिला प्रवर्गातून तिसरी रँक मिळवित यशाला गवसनी घातली. या तरुणीला वर्ग १ मध्ये दुय्यम निबंधक म्हणून नियुक्ती मिळाली आहे. सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्याच्या लेकीने यश संपादन केल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात भारती रविंद्र पाटील हीचा जन्म झाला. वडील उच्चशिक्षीत असल्याने त्यांना आपल्या मुलीने उच्चशिक्षण घेवून प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न बघितले होते. त्यानुसार त्यांची लेक शालेय जीवनापासूनच अभ्यासात हुशार असल्याने त्यांनी लेकीला पाठबळ दिले. गावातीलच शाळेत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर बीएससी मॅथमॅटीक्समध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर २०१८ पासून आपल्या उराशी बाळगलेले प्रशासकीय सेवेचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी अभ्यासाला सुरुवात केली. सहा महिने क्लास लावून अभ्यासाची पद्धत जाणून घेतली.
त्यानंतर भारती हीने घरीच अभ्यासाची स्वतंत्र खोली तयार करुन घेत सेल्फस्टडीला सुरुवात करीत निश्चित केलेल्या यशाकडे मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली.

ओबीसी प्रवर्गातून मिळवली तिसरी रँक २०२१ मध्ये झालेल्या एमपीएससीच्या परिक्षेच्या पुर्वपरिक्षेत भारतीला अपयश आले. मात्र ती खचून न जाता तीच्या कुटुंबियांनी दिलेल्या आधारावर पुन्हा दिवसरात्र अभ्यास सुरु ठेवला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पुर्व परिक्षा पास झाल्यानंतर मुख्य परिक्षेची तारीख जाहीर होत नव्हती. परंतू अशा परिस्थिीत खचून न जाता भारती हीने मुख्य परिक्षेच्या केवळ ४० ते ५० दिवस अगोदर अभ्यास करीत ओबीसी महिला प्रवर्गातून तिसरी रँक मिळवीत यशाचे शिखर गाठले.

यशात आई, वडीलांसह शिक्षकांचा मोलाचा वाटा
वडील उच्चशिक्षीत शेतकरी रविंद्र पाटील असून ते राजकारणात देखील सक्रीय आहेत. परंतु हल्ली राजकारणात तत्वनिष्ठ माणसांची वाणवा झाली आहे. याला अपवाद रविंद्र पाटील असून तत्वांशी तडजोड न करणारा ही व्यक्ती आहे. तर आई गृहीणी आहे. अभ्यासक्रमात असलेल्या कायदेविषयक क्लिष्ट अभ्यासक्रमाविषयी श्रेयस बढे यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच अपयश आल्यानंतर देखील पाठीशी खंबीरपणे उभ्या असलेल्या आई, वडीलांसह अभ्यास करतांना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी लहान भावाचा देखील मोलाचा वाटा असल्याची भावना भारती पाटील यांनी व्यक्त केली.

तिसऱ्या प्रयत्नात उमटवली यशाची मोहर
प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी अभ्यास करीत असतांना भारती पाटील यांना अनेक अडचणी आल्या. परंतू त्यांनी अडवणींवर मात करीत दिवसभरातील पाच ते सहा तास अभ्यास हा त्यांचा नित्यक्रम झाला होता. सोशल मीडियाचा देखील त्यांना अभ्यासात मोठा फायदा झाला असून अवघ्या तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी एमपीएसी परिक्षेत यश संपादन करीत दुय्यम निबंधक पदावर आपल्या यशाची मोहर उमटवली.

Share This Article