वडिलांकडून मिळाली प्रेरणा अन् इम्रान झाले सहाय्यक राज्यकर आयुक्त !
MPSC Success Story : आपल्या आयुष्यात आई – वडील हे आपले पहिले गुरू असतात. त्यांच्याकडून आपण कळत – नकळतपणे घडत असतो. असेच इम्रान शफीक नायकवडी यांना वडिलांकडून प्रेरणा मिळाली. त्याचे वडील हे कर्मवीर भाऊराव पाटील शैक्षणिक संस्थे’तील निवृत्त शिक्षक आहेत. त्यांच्या वडिलांचे अनेक विद्यार्थी अधिकारी आहेत. त्यांच्याकडून इम्रान यांना स्पर्धा परीक्षेला बसण्याची प्रेरणा मिळत गेली.
यातूनच ते अभ्यासाला लागले. त्यांना अभ्यासासाठी घरात खूप चांगला सपोर्ट होता. परंतू घरात पाहिजे तसा अभ्यास होत नव्हता, त्यामुळे त्यांनी पुणे गाठले व तिथे अभ्यास सुरू केला. इम्रान हे मूळचे साताऱ्याचे. सातारा जिल्ह्यातील माण (जि. सातारा) येथून प्राथमिक शिक्षण घेतले. तर कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगरच्या येथे तात्यासाहेब कोरे इंजिनिअरिंग कॉलेजमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंग पूर्ण केले.
काही वेळा अभ्यासाचा कंटाळा यायचा. त्यांना बऱ्याचदा वाटायचे की, आता अभ्यास बंद करून आपला प्लॅन ‘बी’ एक्झिक्युट करावा. मात्र, आताचा हा आपला शेवटचाच अटेम्प्ट असेल याची जाणीवही त्याच वेळी व्हायची. त्यामुळे त्यांनी मन विचलित होऊ न देता अभ्यास सुरूच ठेवला.२०२०-२१ च्या दोन्ही परीक्षा कोरोनामुळे उशिरा झाल्या, त्यामुळे त्यांना अभ्यास करायला आणखी वेळ मिळाला आणि २०२० च्या परीक्षेतून त्यांची उत्पादन शुल्क विभागात पोलीस उप-अधीक्षक (DYSP) पदावर नियुक्ती झाली.मात्र, ‘क्लास वन अधिकारी’ होण्याचे त्यांनी जाणीवपूर्वक पाहिलेले स्वप्न अजूनही अपूर्णच होते. त्यांनी पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली. त्यातून त्यांची क्लास वन पदासाठी निवड झाली.
या संपूर्ण प्रवासाबद्दल सांगताना ते म्हणतात की,शिक्षणाला दुसरा काहीही पर्याय नाही. चांगले शिक्षण मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावीच लागते. वाईट परिस्थितीतही कष्ट करून शिक्षण घेण्याची तयारी ठेवली पाहिजे. शिक्षण म्हणजे फक्त डिग्री पूर्ण न करता ‘स्किल डेव्हलपमेंट’वर भर द्यायला हवा; तसेच, एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नेहमीच आपला प्लॅन ‘बी’ तयार ठेवायला हवा. कारण, सिलेक्शन होणाऱ्या मुलांचे प्रमाण आणि जाहिरातींमध्ये उल्लेख असलेल्या पदांचे प्रमाण यांत खूप तफावत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न तर करायलाच हवा; परंतु प्लॅन ‘बी’सुद्धा तयार ठेवायला हवा.