⁠  ⁠

बारामतीतील किरणची पोलिस उपअधिक्षक/सहायक पोलिस आयुक्त पदी गगनभरारी!

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

बारामती तालुक्यातील काळखैरेवाडीच्या राजबाग येथील भोंडवे कुटूंब. तसे हे कुटुंब शेतीवर अवलंबून असल्याने तशी बेताचीच परिस्थिती होती. गावी राहून कुटुंबाचा खर्च भागत नसल्याने मुंबईला अग्निशामक दलात वडील नोकरीत होते. त्यामुळे, संपूर्ण कुटुंब मुंबईला स्थलांतरित झाले. नोकरी बरोबरच छोटी-मोठी कामे करून आई-बाबांनी तुटपुंज्या पगारावर किरण व त्याचा भाऊ प्रवीण तसेच बहिण शीतल यांनी शिक्षण पूर्ण केले.

किरणचे कांदिवलीच्या यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात शालेय शिक्षण झाले. त्यानंतर यादवराव तासगावकर महाविद्यालयात बायोमेडिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. आपल्या पोलिस दलात क्लासवन अधिकारी व्हावे, अशी किरणच्या आई – वडिलांची इच्छा होती. त्यासाठी त्याने देखील अहोरात्र मेहनत घेतली.

त्याने २०१३पासून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी सुरू केली. सन २०१४ मध्ये असिस्टंट कमांडंट (सीआरपीएफ) मध्ये क्लासवन ऑफिसर म्हणून निवड झाली. सन २०१६पासून असिस्टंट कमांडंट म्हणून प्रशिक्षण घेतले. परंतु, यूपीएससीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी असिस्टंट कमांडंट पदाचा राजीनामा दिला. यूपीएससीच्या मुख्य पाच परीक्षा दिल्या. मात्र, यश मिळाले नाही. न खचता मोठ्या जिद्दीने अभ्यास सुरू ठेवला. सन २०१९ ला मुलाखत झाली. यात नऊ गुण कमी मिळाल्याने ही संधी हुकली.

युपीएससीत काही यश मिळेना म्हणून त्याने एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. यातही कोरोना काळात परीक्षा लांबत गेल्या. त्यानंतर, २०२० मध्ये दिलेल्या परीक्षेत नायब तहसीलदार म्हणून निवड झाली. नोकरी करत असताना सन २०२१ मध्ये दिलेल्या परीक्षेत पोलिस उपअधीक्षक/सहायक पोलिस आयुक्त म्हणून निवड झाली.

Share This Article