आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत शिवा झाला पोलिस उपअधीक्षक ‘क्लास वन’ अधिकारी !
आपली परिस्थिती कशीही असली तरी परिस्थितीशी झगडता आले पाहिजे. शिवा शेळके याची परिस्थिती ही बेताची होती. विडी कामगार म्हणून राबणारी आई आणि पेंटर काम करुन उदरनिर्वाह करणार्या वडिल….अशोक व शांता शेळके यांचे चिरंजीव संतोष (शिवा). त्याचे शालेय शिक्षण हे कोतुळेश्वर विद्यालयात झाले.
लहानपणापासून हुशार असल्याने त्याने केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला. तर पुढील शिक्षण हे संगमनेर येथील श्रमिक महाविद्यालयात झाले, तेथेही तो प्रथम तर नंतर नासिक येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ही तो प्रथम आला होता. त्याच्या अभ्यासातील सातत्याने त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध पदावरील परीक्षा देण्याचा त्याने निर्णय घेतला.
शिवाने अहोरात्र अभ्यास केलाण तब्बल सहा वर्षाच्या खडतर परिश्रमानंतर त्याला आशेचा किरण सापडला आणि त्याची क्लास टू मधून मंत्रालयीन कक्ष अधिकारी या पदावर नियुक्ती झाली. त्याच वेळी २०२२ च्या एका परीक्षेचा निकाल काही अंतरावर लागणार होता, तो निकाल हाती येताच त्याची राज्य विक्रीकर आयुक्त पदी निवड झाली, त्यानंतरही त्याने परीक्षा देणे चालूच ठेवले. आता नुकत्याच जाहीर झालेल्या २०२३ च्या निकालात तो क्लास वन अधिकारी झाला.
आताच्या निकालात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या खडतर परीक्षेत ४७ वी रँक मिळवत पोलिस उपअधीक्षक ‘क्लास वन’ अधिकारी झाला.