अपयशाने खचून न जाता जिद्द, चिकाटीच्या जोरावर यतीनची उपजिल्हाधिकारी पदी बाजी!
MPSC Success Story : कोणत्याही परिस्थितीत लढण्याची ताकद ही परिस्थिती आणि परीक्षा देते. यतीन रमेशचंद्र पाटील याच्या यशाची कहाणी ही काहीशी अशीच आहे. त्याला चारवेळा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेपर्यंत मजल मारूनही अपयश आले.
पण, त्याने जिद्द सोडली नाही की अभ्यासाची कास सोडली नाही. सतत अभ्यास करत राहिला. यतीन हा मूळचा जळगावचा लेक. यतीनचे शालेय शिक्षण मराठा हायस्कूलमध्ये, तर महाविद्यालयीन शिक्षक आरवायके विज्ञान महाविद्यालयात झाले. त्याने गणित विषयात बी. एस्सीचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गणित विभागातून एम.एसस्सी. ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.
पुढे सेट – नेट परीक्षा उत्तीर्ण केली. याच जोरावर काहीकाळ नोकरी देखील केली. पण त्याला कुठेतरी अधिकारी होण्याचे स्वप्न खुणावत होते. सहाय्यक प्राध्यापक पदावर खासगी शैक्षणिक संस्थेत नोकरीला सुरवात केली. मात्र प्रशासकीय सेवेत जाऊन समाजसेवा करण्याचे कुठेतरी मनात दृढ निश्चय त्याने केला होता. त्यामुळे त्याने सहाय्यक प्राध्यापक पदाची नोकरी सोडून यतीनने स्पर्धा परीक्षांच्या तयारीला सुरुवात केली.
यतीन पाटीलचे वडील रमेशचंद्र पाटील भोसला शाळेत शिक्षक, तर आई विमल पाटील गृहिणी आहेत.या दोघांनी देखील त्याच्या या निर्णयाला पाठिंबा दिला. त्याची दोनवेळा यूपीएससी मुख्य परीक्षेत यश मिळविताना निवड झाली नाही. चारवेळा ‘एमपीएससी’ परीक्षेच्या मुख्य परीक्षेपर्यंत मजल मारली. पुढे, कोरोनाचा काळ आला. कोरोनाकाळातही तयारीत सातत्य ठेवताना अखेर राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ मध्ये त्याने यशाला गवसणी घातली.या काळात परीक्षेवरील लक्ष विचलित न होऊ देता तयारी केली आणि तो यशस्वी झाला. हा प्रवास सोपा नव्हता अनेकदा अपयश आले आणि अनेकदा थोडक्यासाठी संधी गेली. पण त्याने करून दाखवले. त्याची उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली.