MPSC Success Story कविता ही सामान्य कुटुंबातील मुलगी. पण लहानपणापासून अधिकारी व्हायचे स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हते.कविताचे आजोबा श्रावण गायकवाड हे नेहमी म्हणायचे, ‘माझी बाई पक्की मोठी अधिकारी होईल’ हेच वाक्य कविताला खूप प्रेरणा देणारे होते आणि हेच स्वप्न मनाशी बाळगले होते. त्यामुळे ध्येय गाठण्यासाठी केलेला संघर्ष चालू ठेवला. तिने त्या स्वप्नांसाठी खूप अभ्यास केला. पिंपळनेर शहरापासून अवघ्या ७ किमी अंतरावरील साक्री तालुक्यातील झंझाळे येथील कविता विजय गायकवाड. तिने उपजिल्हाधिकारी पदी मजल मारली आहे.
तिचे प्राथमिक शिक्षण हे मूळगावी झंजाळे येथे पूर्ण झाले. तर इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतचे शिक्षण कन्या विद्यालय समोडे, नववी मिशन हायस्कूल -नंदुरबार, दहावी रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय, नाशिक येथे पूर्ण झाले. पुढे उच्च शिक्षण घेण्याच्या दृष्टीने तिने अकरावी ते पदवी पर्यंतचे शिक्षण एचपीटी आर्ट्स अँड सायन्स कॉलेज नाशिक येथे घेतले आहे. बारावीमध्ये असताना तिला स्पर्धा परीक्षेची अधिक गोडी लागली.
तिने त्यापासूनच अभ्यासाला सुरुवात केली.नाशिकच्या मुरकुटे ग्रंथालयात अभ्यास (सेल्फ स्टडी) करण्यास सुरूवात केली. त्याच सातत्याने अभ्यासाच्या बळावर तिने विविध सरकारी पदे देखील मिळवली.कविताने आतापर्यंत २०१४ मध्ये कनिष्ठ लिपिक पदाची परीक्षा उत्तीर्ण होऊन जलसंपदा विभाग येवला येथे नोकरी केली. त्यानंतर २०१५ मध्ये पोलिस उपनिरीक्षक पदासाठी निवड होऊनही रुजू झाली नाही. त्याच्या पुढच्याच वर्षी २०१६ मध्ये पुन्हा विक्रीकर सहाय्यक पदी निवड झाली होती मात्र ही नोकरी देखील कविताने स्वीकारली नाही. २०१७ मध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी पदी निवड झाली होती.
येथे कविताने अडीच वर्षे नोकरी सांभाळली. असे असतांनाच २०१८ मध्ये राज्यसेवेतून मुख्याधिकारी म्हणून निवड झाली होती.पण तिला उपजिल्हाधिकारी पद हवे होते. त्यासाठी,कविताने काही मोठया पदाच्या नोकऱ्याही नाकारल्या व मला पुढे कसे जाता येईल, सतत अभ्यास कसा करता येईल त्याच नोकरीला प्राधान्य दिले.त्यासाठी तिने पुन्हा ध्यास घेतला.ग्रामीण भागात मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या कविताने २०१९च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून थेट उपजिल्हाधिकारी पदापर्यंत मजली. इतकेच नाहीतर एसटी संवर्गातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन पंचक्रोशीतील कविता पहिली उपजिल्हाधिकारी बनली आहे