MPSC Success Story : घरात अठराविश्व दारिद्र्य, पितृछत्र हरविलेले, कोणाचेच फारसे आर्थिक सहकार्य नाही, आई मोलमजुरी करणारी….अशा परिस्थितीत उच्च शिक्षण घेणे आणि लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होणे. हा जिद्दीचा प्रवास आहे. हा यशोगाथा आहे बीडीओ महेश सुरेश वाढई यांची…त्याच्या आयुष्यात बार्टीचे केंद्र हे खरे आयुष्याला कलाटणी देणारे ठरले.एमपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी महेशकडे तेवढ्या सुविधा नव्हते. शिक्षण व क्लासेससाठी पैसे नाहीत. तरीही अधिकारी बनण्याची चिकाटी महेशला स्वस्थ बसू देत नव्हती. दरम्यान, बार्टीची परीक्षा व त्यातून मोफत मिळालेली केंद्राची संधी हे महेशच्या करिअर व जीवनाला कलाटणी देणारी ठरली.
पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील मोफत स्पर्धा परीक्षा केंद्रातूनही त्याला चांगली तयारी करता आली. तसा महेश वाढई हा लहानपणापासून खूप हुशार होता. महेश केवळ दोन वर्षे वयाचे होते, तर त्यांचा लहान भाऊ अजय हा दोन महिन्यांचा होता. तेव्हा वडील वारले मग आजी, आई व दोन भावंडे असा महेशचा परिवार…आईने मोलमजुरी करून मुलांना शिक्षण दिले.
महेशचे प्राथमिक शिक्षण रामनगर प्राथमिक शाळा गडचिरोली येथे झाले.माध्यमिक शिक्षण वसंत विद्यालय, तर अकरावी व बारावीचे शिक्षण शिवाजी विज्ञान कॉलेज येथून झाले. दहावीला ७७.२० तर बारावीला ६८.५० टक्के गुण महेशला मिळाले. त्यानंतर, महेशचा नंबर चंद्रपूर येथील राजीव गांधी अभियांत्रिकी कॉलेजमध्ये लागला. शिष्यवृत्तीच्या माध्यमातून त्याने येथून सॉफ्टवेअर इंजिनीयरचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर, महेशने गडचिरोली येथून घरीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षेची तयारी सुरू केली. दरम्यान, त्याने बार्टीची परीक्षा उत्तीर्ण केली. या माध्यमातून त्याचा पुणे येथे दोन वर्षांकरिता स्पर्धा परीक्षेसाठी नंबर लागला. येथूनच
महेशच्या तयारीला वेग आला. महेशने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर एमपीएसीची तयारी सुरु केली. सन २०१६ पासून सातत्याने त्यांनी एमपीएससीतून विविध पदांच्या परीक्षा दिल्या. पूर्वआणि मुख्य परीक्षेत यश मिळून मुलाखतीपर्यंत महेश पोहोचत होता. दरम्यान, मुलाखतीत दोन ते तीन गुणांनी त्याला अपयश येत होते. मात्र, महेश सातत्य व परिश्रम सोडले नाही. राज्यसेवा परीक्षेच्या पाच मुलाखती दिल्या. २०१७ मध्ये पोलिस उपनिरीक्षक पदासाठी दोनदा, २०१८ मध्ये वनविभाग आरएफओ, एसीएफ, तसेच २०१९ मध्ये पुन्हा वनविभाग आणि २०२० व २०२१ मध्येही मुलाखती दिल्या. दरम्यान, महेशला २०२३ च्या राज्य सेवा परीक्षेत यश आले व तो बीडीओ अधिकारी बनला.