कठोर परिश्रमानंतर अखेर निवेदिता बनली संगणक अभियंता अधिकारी !
आपल्या मनातील इच्छा ह्या पूर्ण होतातच. त्यासाठी सातत्य हवं. निवेदिता ही लांजा या भागातील लेक.सेवानिवृत्त लिपिक नंदू आंबेकर आणि सेवानिवृत्त न्यायालयीन अधीक्षक सौ आंबेकर यांची मुलगी. तिचे शालेय शिक्षण हे गावातच झाले. ती लांजा हायस्कूलमधील खो- खो खेळातील राज्यस्तरीय खेळाडू आहे. तिने लांबउडी या क्रीडा प्रकारात राज्यस्तरीय यश मिळवले होते.
दहावी शालान्त परीक्षेत गुणवत्ता यादीत जिल्हात प्रथम आली होती. महाड येथे संगणक अभियंता पदवी प्राप्त करून तिने सनदी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यासाठी तिने खूप खूप मेहनत घेतली. गेली ४-५ वर्षे राज्यसेवेसारख्या अनेक स्पर्धांना सामोरे जात पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखती देऊन सर्व टप्पे पार केले.तिने पुणे येथे अभ्यासिकेमध्ये विविध स्पर्धा परीक्षा यांची तयारी केली. गेली काही वर्ष ती कठोर परिश्रम करीत होती. लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊनही कधी मुलाखतीमध्ये अपयश आले तरीही न डगमगता स्पर्धा परीक्षा देत राहिली.
तसेच या प्रवासात अपयशाने खचून न जाता सातत्यपूर्ण प्रयत्न, चिकाटी, मेहनत व संयम ठेवून निवेदिता ने अखेर यश खेचून आणलेच.राज्य सेवा स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून महाराष्ट नगर परिषदेमध्ये नुकत्याच जाहीर झालेल्या राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत तळवडे येथील कु. निवेदिता नंदकुमार आंबेकर हिने संगणक अभियंता अधिकारी क्लास 2 श्रेणीमध्ये पाचवे नामांकन प्राप्त करून यश संपादित केले आहे.