आदिवासी पाड्यात वाढलेली पूजा झाली तहसीलदार; गावची ठरली शान!
MPSC Success Story जेव्हा एखाद्या वंचित आणि गरजू भागातील युवक – युवती गगनभरारी घेतात, तेव्हा साऱ्या गावासाठी अभिमानाची गोष्ट ठरते. इतकेच नाहीतर तर ते बघून अनेक जणींना प्रेरणा मिळत राहते. अशीच जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा येथील भोईरवाडीमधील पूजा शिवाजी भोईर हिने तहसीलदार पद मिळवून गावाचे नाव मोठे केले आहे.
पूजा ही आदिवासी भागात लहानाची मोठी झाली. हिचे वडिल शिवाजी रामभाऊ भोईर हे नोकरी निमित्त सांगली येथे स्थायिक असून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत ते फिल्ड ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत तर, पूजाची आई आशा ह्या गृहीणी आहेत. पूजाला प्रतिक व ऋतीक हे दोन भाऊ असून प्रतिक ओतूर येथील अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात शिक्षण घेत आहे तर ऋतीक हा कोल्हापूर येथे कृषी क्षेत्रात शिक्षण घेत आहे.
पूजाचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विटा जि.सांगली येथे झाले तर, पदवीचे अवसरी (ता.आंबेगाव) तर पुण्यात पदव्युत्तर शिक्षण झाले. राज्यसेवा आयोग परीक्षेची तयारी पूजाने पुणे युसिटीच्या लायब्रेरीमध्ये दहा ते बारा तासा पेक्षा जास्त वेळ अभ्यास करून केले. पूजाचा दिनक्रम सकाळी सात वाजेपासून लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास सुरु करायचा ते रात्री नऊ ते दहा वाजे पर्यंत तेथेच असायची. ती सर्व जेवण नाश्ता तेथेच करत असे.
पूजाच्या आई आशा भोईर यांनी पूजाच्या अभ्यासाकडे दहावीपासूनच विशेष लक्ष दिले.शिवाजी भोईर यांना शिक्षणाची आवड असल्याने त्यानी स्व:ताच खडतर परिस्थितीत शिक्षण पूर्ण केल्यामूळे त्यांनी मुलांच्या शिक्षणाला जास्त महत्त्व दिले. त्यामुळेच, आदिवासी भागातील मूलीने तहसिलदार पदाची परीक्षा पास होऊन परिसराचे व आई- वडिलांचे नाव उज्ज्वल केले.तहसीलदार पदावरच न थांबता पूढे अभ्यास सुरु ठेवून तिला डेप्युटी कलेक्टर किंवा कलेक्टर व्हायचे आहे.