MPSC Success Story : आपल्या घरची परिस्थिती कशीही असली तरी आपल्या परिस्थितीवर मात करता आली पाहिजे. प्रगती काशीद हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत दुहेरी यश मिळवले आहे.चिखली, मोरेवस्ती येथे वास्तव्यास असलेली ही लेक. प्रगतीचे वडील शिवाजी हे रिक्षाचालक, तर आई रेणुका गृहिणी. घरची परिस्थिती बेताची… त्यामुळे तिने या सगळ्याची जाणीव ठेवून अभ्यास केला. तिने शालेय जीवनातच अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले.
तिने सातवीत असतानाच प्रगतीने ‘एमपीएससी’ परीक्षा उत्तीर्ण होण्याचे ध्येय उराशी बाळगले होते. बीएसस्सीची पदवी घेतल्यानंतर प्रगतीने २०२० पासून एमपीएसी परीक्षेची तयारी सुरू केली.ती नियमित पहाटे साडेपाच वाजता उठून अभ्यासाला बसायची. दररोज दहा तास अभ्यास करायची. प्रचंड कष्ट घेऊनही पहिल्या प्रयत्नात अवघ्या दोन गुणांनी तिला अपयशाचा सामना करावा लागला. पण, ती खचून गेली नाही. तिने जिद्दीने पुन्हा तयारी सुरू केली.
विक्रीकर निरीक्षक आणि मंत्रालयातील सहायक कक्ष अधिकारी या दोन्ही पदांना प्रगतीने गवसणी घातली आहे. वयाच्या २४ व्या वर्षी हे यश मिळविणाऱ्या प्रगतीने परीक्षेतील यशाद्वारे आपले कर्तृत्वही सिद्ध केले आहे. जिद्द असेल, तर यश साध्य होतेच. घरची परिस्थिती गरीब असूनही जबरदस्त इच्छाशक्ती आणि कठोर मेहनतीच्या जोरावर येथील परीक्षेतील हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी प्रवास आहे.