MPSC Success Story : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील लिंगदेव येथे रहिवासी असणाऱ्या या दोन सख्ख्या बहिणी. त्यांचे वडील देविदास फापाळे मालपाणी इंडस्ट्रीमध्ये सुपरवायझर म्हणून काम बघतात. तसेच सोबतीला खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अनेक वर्षे आरोग्य सेवक म्हणून काम करतात. आतापर्यंत फापाळे दापत्यांनी मोलमजुरी करून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मुलगा ईश्वर, मुलगी प्रेरणा व संध्या या तीनही मुलांना उच्च शिक्षण दिले.
प्रेरणा आणि संध्या फापाळे या दोन्ही बहिणींचे प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न होते. ते स्वप्न पूर्ण पूर्ण करण्यासाठी त्या दिवसरात्र अभ्यास करायच्या. आपली परिस्थिती कोणतीही असली तरी हे स्वप्न पूर्ण करायचे, हे त्यांनी निश्चय केला होता.याच आत्मविश्वासाच्या जोरावर दोघींनाही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सुयश मिळविले. प्रेरणा ही विक्रीकर निरीक्षक, तर संध्या ही मंत्रालयीन लेखनिक बनली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून प्रेरणा फापाळे हिने वर्ग २ तर संध्या फापाळे हिची वर्ग ३ या पदावर नियुक्ती झालेली आहे. संध्या फापाळे हिने पद्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर तिचे लग्न झाले. परंतू, घरातील कौटुंबिक वादामुळे घटस्फोट झाला आणि बहीण प्रेरणा ही जशी प्रशासकीय अधिकारी झाली तसेच आपणही अधिकारी बनून स्वतःच्या पायावर उभी राहू शकते असे तिने मनाशी पक्के ठरवले. त्यानंतर कुठल्याही प्रकारचा क्लास न लावता तिने अभ्यासाला सुरुवात केली. अभ्यासात सातत्य ठेवल्यामुळे तसेच बहिणीचे मार्गदर्शन घेतल्याने ती पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले.
त्यांचे हे सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण झाले असले तरी दोघींनाही क्लासवन अधिकारी व्हायचे आहे, यासाठी दोघींही तयारी करत आहेत.