MPSC Success Story : आपण स्वप्ने नुसती पाहायची नसतात तर ती प्रत्यक्षात देखील साकार करायची असतात. शलाकाने देखील मेहनतीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली.
स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात प्रचंड स्पर्धा असली तरी रचनात्मक सातत्यपूर्ण अभ्यास, चिकाटी, मेहनत ही त्रिसूत्री हमखास यशाची गुरुकिल्ली आहे, हे लक्षात घेऊन अभ्यास केला. तिने स्वयं अध्यनाबरोबरच अभ्यासात सातत्य ठेवले.तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शलाकाचे प्राथमिक शिक्षण शारदादेवी व माध्यमिक शिक्षण जिजामाता कन्या विद्यालय देवळा येथे शालांत परीक्षेत ९४ % गुण मिळवून पूर्ण झाले. कुटुंबातील एकजण तरी सरकारी अधिकारी व्हावे. असेच स्वप्न शलाकाच्या आई–वडिलांनी बाळगले. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शलाकाने देखील प्रचंड मेहनत घेतली. उच्च माध्यमिक शिक्षण नाशिक येथील केटीएचएम महाविद्यालयात झाले. बारावीनंतर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजच्या वडगाव पुणे (मॅकेनिकल) शाखेत प्रवेश घेतला.बी.ईच्या आठही सेमिस्टर मध्ये विशेष प्राविण्यासह पदवी मिळवल्यानंतर शलाकाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेकडे आपले लक्ष केंद्रित केले. शलाका लहानपणापासून अभ्यासात हुशार होती.
देवळा तालुक्यातील वाखारी येथील व देवळा एज्युकेशन संस्थेतील उच्च माध्यमिक शिक्षक(सेवानिवृत्त) आर एन शिरसाठ व माध्यमिक शिक्षिका सुनिता निकम यांची कन्या शलाका शिरसाठ हिचे आई – वडील दोघेही शिक्षक असल्याने माझ्या शिक्षणासाठी नेहमीच त्यांनी मोकळीक दिली. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करताना कुठलेही दडपण नव्हते. स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी तिने सातत्यपूर्ण अभ्यास सुरू केला.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२१ साठीच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षक पद संपादित केले. तिच्या या यशामुळे आईवडिलांचा उर भरून आला