लेकीने वडिलांचे स्वप्न केले पूर्ण ; श्रद्धा बनली क्लास वन अधिकारी!
MPSC Success Story : श्रध्दा उरणे हिचे लहान असतानाच वडिलांचे छत्र हरपले. पण तिने शिक्षणाची कास सोडली नाही. तिच्या वडिलांची इच्छा होती की आपल्या मुलीने मोठे होऊन अधिकारी बनावे. ही इच्छा तिने पूर्ण करण्याचे ठरवले. तिचे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद मुलींच्या शाळेत झाले. तर माध्यमिक शिक्षण हे शंकरराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पूर्ण झाले.
तिचे वडील अनगर येथील लोकनेते व्यापारी गाळ्यात मोटार सायकल पंक्चर काढण्याचे दुकान चालवीत होते.पण ती अकरावीत असताना तिच्या वडीलांचे गंभीर आजाराने निधन झाले. पुढे तिने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्याच सोबत स्पर्धा परीक्षेची तयारी केली.
अहोरात्र मेहनत घेतली…अभ्यास केला. दिवसाचे दहा – बारा तास अभ्यास केला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दुय्यम उपनिबंधक श्रेणी – १ या पदासाठी नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या मुख्य आणि एप्रिल २०२३ मध्ये झालेल्या पूर्व परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यामध्ये येथील श्रद्धा किसन (धनंजय) उरणे ही राज्यातील ओबीसीच्या ४९ जागांमधून मुलीमध्ये पहिली आली आहे.