MPSC Success Story : गावातील मुलाला वर्दी मिळणं हे गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे. शुभम दहावीत शिकत असतांना, त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं. घरातील कर्ता पुरूष गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. पण तो खचून गेला नाही त्याने हिंमतीने अभ्यास केला वेळप्रसंगी काम देखील केले आणि सरकारी अधिकारी झाला.
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे राहणारा शुभम शिंदे. शुभमचे वडील हे खाजगी वायरमन होते. वडिलांच्या निधनानंतर दोन मुलांची आणि कुटुंबाची सर्व जबाबदारी ही शुभमच्या आई सरला शिंदे यांच्या खांद्यावर येवून पडली. ऐन उमेदीच्या काळात पती गेल्याचं दु:ख सरला या कवटाळून बसल्या नाहीत. दोन्ही मुलांसाठी सरला शिंदे यांनी पदर खोचला आणि त्या घराबाहेर पडल्या. मुलांच्या शिक्षणासाठी दिवसरात्र कष्ट करून त्यांनी शिकवले.
शुभमने महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना एका खाजगी क्लासच्या कार्यक्रमात अधिकारी झालेल्या मुलांचा त्यांच्या आई-वडिलांसह सत्कार करताना बघितलं आणि आपणही अधिकारी व्हायचं हा ध्यासचं जणू शुभमनं घेतला. पण क्लास लावण्याची आपली परिस्थिती नाही हे जाणून घेऊन त्यानं रात्रीचा दिवस करून अभ्यास केला आणि आज तो विना क्लास अभ्यास करून त्याचा ध्यास त्यानं तडीस नेला आणि आज तो PSI आहे. चार ते पाच हजार लोकसंख्येच्या धरणगाव तालुक्यातील चांदसर गावातील शुभम शिंदे झाला पहिलाच अधिकारी.शुभमने कठोर परीश्रम आणि प्रचंड जिद्दीने अभ्यास केला.
शुभम याला सुरुवातीपासून पोलीस खात्याचं विशेष आकर्षण होतं. पहिल्यांदाच सप्टेंबर २०२१ मध्ये शुभमने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात शुभम हा परीक्षा उत्तीर्ण झाला. त्यानंतर मुख्य परीक्षेसाठी शुभमने जळगावला अभ्यासिका लावली. अनेक मुलाखती पाहून प्रत्येकाचा संदर्भ घेत शुभमने अभ्यासासासाठी निवडक अशा स्वत:ची पुस्तकाची लिस्ट तयार केली. खाजगी क्लास लावण्यासारखी कुटुंबाची परिस्थिती नव्हती. त्यामुळे घरच्या घरीच शुभम अभ्यास करायला लागला.दिवसरात्र अभ्यास करुन २०२२ मध्ये झालेली मुख्य परीक्षा उत्तीर्ण होत शुभमने त्याच्या पहिल्याच प्रयत्नात यशाला गसवणी घातली व अवघ्या २५ व्या वर्षीच अधिकारी म्हणून अंगावर वर्दी चढविली.