सिध्दांतला चौथ्या प्रयत्नात मिळाले MPSC च्या परीक्षेत घवघवीत यश !
MPSC Success Story : स्पर्धा परीक्षा म्हटलं की यश – अपयशाची निराळी परीक्षा असते. सिध्दांत सावंतने तब्बल तीन वेळा एमपीएससी परीक्षा दिली. पण त्यात यश आलं नाही. पण त्याने संयमाने अभ्यास चालू ठेवला आणि तो चौथ्या प्रयत्नात उत्तीर्ण झाला.चिपळूण तालुक्यातील आगवे या ग्रामीण भागातील सिद्धांत सावंत याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मिळवलेले यश हे अनेकांसाठी प्रेरणादायी प्रवास आहे.
जिद्द, अभ्यास करण्याची तयारी मेहनत घेण्याची तयारी आणि चिकाटी असेल तर कोणतीही कठीण गोष्ट सोपी होते. हेच सिद्धांतने दाखवून दिले आहे. २०१९ पासून एमपीएससी परीक्षेत प्रयत्न करत असलेल्या सिद्धांतला चौथ्या वेळी या परीक्षेत मोठं यश मिळालं आहे.सिद्धांताचे वडील हे सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक आहेत.
आई गृहिणी आहे तर सिद्धांताचा छोटा भाऊ हा सिव्हिल इंजिनियर आहे.त्याचे चिपळूण तालुक्यात डेरवण येथे पहिलीपासून दहावीपर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर दहावी ते बारावी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर येथे शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला. या महाविद्यालयातून बीएससी आयटीपर्यंत शिक्षण त्याने पूर्ण केले.
मग त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली.यानंतर त्याने २०१९ ला एमपीएससीचा अभ्यास सुरू केला. पुढे राज्यसेवा आणि गट ब च्या जवळपास सात मुख्य परीक्षा दिल्या. हा माझा चौथा प्रयत्न होता. यासाठी दोन वर्षांपूर्वी पुण्यातही एका क्लास जॉईन केला होता. तेथील सरांचंही मार्गदर्शन मिळालं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गुणोत्तर यादीत तो १४१ व्या क्रमांकावर चमकला आहे. आता लवकरच राजपत्रित अधिकारी म्हणून त्याला शासन सेवेत संधी मिळाले आहे.