अपयश आले तरी खचला नाहीतर लढला ; अखेर सिद्धांतने MPSC परीक्षेत मिळविलं यश..
MPSC Success Story आपल्या आयुष्यात कधी यश येते तर कधी अपयश…पण प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक बघितले तर यशाची पायरी गाठता येते. हेच सिद्धांत याने दाखवून दिले आहे. सिद्धांत हा चिपळूण तालुक्यातील आगवे या ग्रामीण भागातील रहिवासी.याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मोठे यश मिळवलं आहे.
सिद्धांताचे वडील हे सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक आहेत. आई गृहिणी आहे तर सिद्धांताचा छोटा भाऊ हा सिव्हिल इंजिनियर आहे.सिद्धांत सावंतचे चिपळूण तालुक्यात डेरवण येथे पहिलीपासून दहावीपर्यंत शिक्षण झाले. त्यानंतर दहावी ते बारावी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर येथे शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला. या महाविद्यालयातून बीएससी आयटीपर्यंत शिक्षण त्याने पूर्ण केले. त्यानंतर एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली.
यासाठी त्याने पुण्यातील सारथी संस्थेकडून ऑनलाईन मार्गदर्शन घेतले. सारथीचे मार्गदर्शन आणि पुण्यातील काही शिक्षक मंडळींचे मार्गदर्शन यामुळे त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला अधिक चालना मिळाली. त्यानुसार त्याने अभ्यास केला. या दरम्यान कोरोना काळ आला त्यामुळे त्याला घरूनच अभ्यास करावा लागला. या मेहनतीच्या जोरावर त्याने तब्बल चार वेळा एमपीएससी परीक्षा दिली. पण त्यात यश आलं नाही.
त्याने २०१९ ला एमपीएससीचा अभ्यास सुरू केला. पुढे राज्यसेवा आणि गट ब च्या जवळपास सात मुख्य परीक्षा दिल्या. हा आताचा त्याचा चौथा प्रयत्न होता.या चौथ्या प्रयत्नात त्याने २०२२ साली त्याने दिलेल्या एमपीएससी परीक्षेत त्याने हे यश खेचून आणलं आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गुणोत्तर यादीत तो १४१ व्या क्रमांकावर चमकला आहे. त्याला राजपत्रित अधिकारी म्हणून त्याला शासन सेवेत संधी मिळाली आहे. यात त्यांच्या घरच्यांचा आणि कुटुंबियांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. मित्रांनो, जिद्द, अभ्यास करण्याची तयारी मेहनत घेण्याची तयारी आणि चिकाटी असेल तर कोणतीही कठीण गोष्ट सोपी होते.